संगमनेरातील पाच बेकायदेशिर कत्तलखाने जमीनदोस्त

संगमनेरातील पाच बेकायदेशिर कत्तलखाने जमीनदोस्त

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने नष्ट करावे, कत्तलखाना चालविणार्‍यांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकार्‍यास निलंबीत करावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला काल दुपारी पहिले यश आले आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काल दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह जाऊन जमजम कॉलनी परिसरातील पाच कत्तलखाने उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईनंतर पोलीस अधिकार्‍यांवर केव्हा कारवाई होते याकडे आंदोलनकर्त्यांची लक्ष आहे.

महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेरात मात्र या कायद्याचे पालन केले जात नाही. शहरातील जमजम कॉलनी, जोर्वे रोड, कोल्हेवाडी रोड या परिसरात खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने सुरू होते. या कत्तलखान्याला मधून दररोज अनेक गोवंश या जातीच्या जनावरांची कत्तल करण्यात येत होती. या कत्तलखान्यात तयार झालेले हजारो किलो गोमांस दररोज वेगवेगळ्या वाहनांमधून मुंबई, ठाणे, गुलबर्गा आदी ठिकाणी निर्यात करण्यात येत होते. यामुळे राज्यामध्ये संगमनेरची वेगळी ओळख निर्माण झाली होती. याबाबत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवूनही पोलिसांनी कठोर कारवाई केलेली नव्हती.

ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते यतीन जैन यांनी पुढाकार घेतल्याने नाशिक व अहमदनगर येथील पोलिस पथकांनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी शहरातील कत्तलखान्यावर मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचे मास जप्त केले होते. या कारवाईनंतर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या संघटनांनी शहरातून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावे, यातील गुन्हेगारांना तडीपार करावे, पोलिस अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करावे या मागण्यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. 48 तासांमध्ये शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचे लेखी आश्वासन मुख्यधिकार्‍यांनी दिले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com