अज्ञात इसमाने संगमनेर तालुक्यातील तीन बंधारे फोडले

अज्ञात इसमाने संगमनेर तालुक्यातील तीन बंधारे फोडले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

अज्ञात इसमाने तालुक्यातील निमज, वेल्हाळे, भोजापूर येथील तीन बंधारे फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. बंधारे फोडणारा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याच्याविरुद्ध अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप संबंधित गावातील ग्रामस्थांमधून केला जात आहे.

तालुक्यातील निमज येथे अनेक वर्षांपूर्वीचा जुना बंधारा होता. हा बंधारा अचानक फुटला. एका राजकीय पदाधिकार्‍याची जमीन या बंधार्‍या लगत होती. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हा बंधारा फोडला असल्याची चर्चा होत आहे बंधारा फुटल्यामुळे बंधार्‍यातील सर्व पाणी जलदगतीने वाहून गेले. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याचे समजल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. मोठा बंधारा फोडल्यानंतर देखील या राजकीय पदाधिकार्‍यावर प्रशासनाने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे, प्रशासन या राजकीय पदाधिकार्‍याला पाठीशी घालत असल्याची अशी चर्चा संबंधित गावात रंगू लागली आहे.

बंधारा फोडल्याच्या घटनेला दुजोरा

याबाबत निमज ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता बंधारा फोडल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. हा बंधारा गावातील व्यक्तीने फोडलेला नसून खांडगाव येथील एका इसमाने फोडलेला आहे. सदर इसमाने निमज येथे नवीन शर्तीची जमीन खरेदी केली असून त्याच्या फायद्यासाठी त्याने शेतकर्‍यांचे नुकसान केले आहे. याबाबत गावातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता बंधारा फुटला असल्याबाबतचा अहवाल संबंधित खात्यांनी आपल्याला दिला असल्याचे त्यांनी सांगितले. बंधारा फुटला की फोडला याबाबतची माहिती आपल्याकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही. वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून गावामध्ये बंधारे बांधण्यात येतात याबाबतची माहिती आपणाकडे नसल्याचे श्री. निकम यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com