
घारगाव | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वडदरा (बोटा) येथे उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय-६२) या व्यक्तीवर घरात येऊन बिबट्याने हल्ला केल्याने मृतदेह शनिवारी रात्री (२२ एप्रिल) घरात आढळल्याने खळबळ उडाली होती. कुऱ्हाडे यांच्या मृतदेहाची अवस्था पाहून त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती.
मात्र, मृतदेह शवविच्छेदनाचा अहवाल काही वेगळच सांगत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केल्याने या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. संबंधित कुऱ्हाडे यांच्या मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसून त्याचा धारदार हत्याराने खून झाल्याचे समोर आले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा येथे अविवाहित उत्तम कुर्हाडे आपल्या ऐंशी वर्षाच्या आईसमवेत राहतात. शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आई कासाबाई समवेत घरात होते. त्यांच्या आईला कुर्हाडे यांचा मृतदेह घरातील चुलीसमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
आई कासाबाई यांनी घराच्या बाहेर येवून जोरजोराने आरडाओरडा केल्याने आजूबाजूला असलेल्या भावबंधांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर काहींनी घटनेची माहिती घारगाव पोलिस व वनविभागाला दिली त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. कुर्हाडे यांच्या शरीरावरील जखमाबघून हा हल्ला बिबट्याने केला असल्याची अफवा गावभर पसरली होती.
शनिवारी रात्री कुर्हाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आला होता. मात्र रविवार( ता. २३) एप्रिल रोजी सकाळी कुऱ्हाडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर उत्तम कुर्हाडे यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. त्यानंतर दुपारी कुऱ्हाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. नगर येथील श्वान पथक, ठसेतज्ञ पथक यांनाही रविवारी घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. खून झालेल्या ठिकाणी रक्ताचा सडा वगळता इतर काही संशयास्पद वस्तू न आढळल्याने श्वानपथकाला पुन्हा माघारी जावे लागले.
उत्तम कुर्हाडे यांचा परिसरात कोणाशी वाद होता का? याचा तपासही पोलिस करत आहे. कुर्हाडे यांचा खून नेमका कोणी केला आणि कशासाठी केला पोलिस तपासात उघड होणार आहे. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यातच कुर्हाडे यांचा मृत्य झाल्याचे सांगण्यात आले होते,मात्र खरे कारण हे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
जवळील नातेवाईकांचे रविवारी सायंकाळी घारगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलवत जवाब घेतले. मात्र रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन अहवाल घारगाव पोलिसांना प्राप्त झाला नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. शवविच्छेदन अहवालप्रत प्राप्त होताच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी सांगितले.
उत्तम कुऱ्हाडे यांचे शवविच्छेदनामध्ये त्यांना पाठीवर धारधार हत्याराने जखम होऊन हृदय आणि फुफ्फुसाला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
संदिप कचोरीया, वैद्यकीय अधिकारी
दोन दिवसापूर्वीच काढले होते सोसायटी कर्ज
उत्तम कुऱ्हाडे यांनी बोटा विविध कार्यकारी सोसायटीचे नियमित कर्जदार होते. दोन दिवसापूर्वीच त्यांनी सोसायटीकडून २ लाख ५६ हजारांचा धनादेश घेतला होता. त्यांनी धनादेश अहमदनगर जिल्हा बँकेत वटवट ते पैसे आपल्या खात्यात भरले होते की सर्व पैसे बँकेतून काढत घरी नेले होते. पैसे घरी नेले असतील तर पाळत ठेऊन त्यांचा खून झाला अशा अनेक बाबीचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.