
संगमनेर | शहर प्रतिनिधी
दोन चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीएम (Maharastra Bank ATM) मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना शहरातील जाणतानगर परिसरात काल रात्री घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून यातील एका चोरट्यास पकडले असून दुसरा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. (ATM theft )
शहरातील जाणता राजा मैदान जवळील मालपाणी हॉस्पीटल जवळ महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. बँकेशेजारी असलेले या बँकेचे एटीएम हे 24 तास चालु असते. शुक्रवारी बँकेचे कामकाज आटोपून सर्व कर्मचारी आपापल्या घरी गेले. बँकेचे असिस्टंट मॅनेजर अक्षय जवरे हे झोपेत असतांना ए. एन. जी. कंपनीचा एटीएम सेक्युटरी मोबाईल नंबर वरून त्यांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न चालु आहे असा फोन आला. यानंतर ते त्वरित बँकेसमोर पोहोचले.
पोलिसांनाही सुरक्षा नंबर वरून फोन केल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. या ठिकाणी पोलीस नाईक विवेक जाधव यांनी एका चोरट्याला पकडले. मात्र दुसर्या चोरट्याने जाधव यांना धक्काबुक्की करुन पळून गेला. हे घडत असतांना पोलीस नाईक सचिन उगले, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे दोघे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी एटीएममध्ये घुसलेल्या दोन चोरट्यांपैकी मशिनचा दरवाजा फोडीत असतांना एका चोरट्यास जागीच पकडले. यावेळी एटीएम मशिनचा पत्रा उचकुन त्याचा हँन्डेल तुटलेला दिसला.
पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यास त्याचे नाव विचारले असता मंगेश बाळु गांगुर्डे (वय 20, रा. चास, ता. अकोले) असे त्याने स्वतःचे नाव सांगितले. पळुन गेलेल्या इसमाचे नाव समीर बर्डे (रा. चास, ता. अकोले) असे असल्याचेही त्याने सांगितले. हे चोरटे स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम एच 15 बीपी 3203) ही घेवुन आलेले होते. आपली मोटरसायकल त्यांनी एटीएमचे बाहेर लावलेली होती.
याबाबत बँकेचे असिस्टंट मॅनेजर अक्षय संजय जवरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मंगेश बाळु गांगुर्डे व समीर बर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.