आंबी खालसा येथील बंधाऱ्याच्या ५० ते १०० लोखंडी ढाप्यांची चोरी; वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी हैराण

आंबी खालसा येथील बंधाऱ्याच्या ५० ते १०० लोखंडी ढाप्यांची चोरी; वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी हैराण

घारगाव | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील मूळानदीवर असलेल्या आंबी-खालसा या बंधाऱ्यामधील ५० हजार रुपये किंमतीचे ५० ते १०० लोखंडी ढापे चोरीला गेल्याची घटना आंबी-खालसा येथे २२ ऑक्टोंबर ते २८ ऑक्टोंबर दरम्यान घडली. चोरीचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. दोन महिण्यापूर्वी जांबूत येथील बंधाऱ्याचे ४४ ढापे चोरीला गेले होते. आणि पुन्हा ढापे चोरीला गेल्याने वाढत्या चोऱ्यांनी शेतकरी हैराण झाले आहेत.

आंबी-खालसा गावच्या हद्दीत मूळा नदीवर घारगाव –आंबी हा कोल्हापूर पद्धीचा बंधारा असून, या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग घारगाव, आंबी खालसा, सराटी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांना होतो. आंबी-खालसा येथील शेतकरी पाणी अडविण्यासाठी ढापे टाकण्यासाठी गेले असता त्यांना ढापे आढळून आले नाही. त्यांनी सरपंच बाळासाहेब ढोले यांना सांगितले. बंधाऱ्याच्या जवळ असलेले ५० ते १०० लोखंडी ढापे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ढोले यांनी घारगाव पोलिसांना ढापे चोरीची माहिती कळवली.

घटनास्थळी जाऊन घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आर.व्ही.खेडकर यांनी पहाणी केली. सरपंच ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत. फिर्यादीत दिलेल्या ढाप्यांची संख्या कमी असून अधिक ढापे चोरीला गेले आहेत. त्यांची किंमतही लाखो रुपयांची असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नवनियुक्त पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी लक्ष घालावे....

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी चारचाकी, दुचाकी चोरी, दुकाने, घरफोड्या, विद्युत पंपांची चोरी, केबल चोरी अशा अनेक चोऱ्या झालेल्या आहेत. मात्र, या चोऱ्यांचा शोध लावण्यात घारगाव पोलिसांना यश आलेले नाही. चोरीच्या घटना रोखण्यात घारगाव पोलीस अपयशी ठरत असल्याने नवे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात झालेल्या चोऱ्या व पोलिसांकडून झालेला तपास यांची सविस्तर माहिती मागवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com