वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नवीन डी.बी.ची स्थापना

वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नवीन डी.बी.ची स्थापना

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही महिन्यापासून विविध प्रकारच्या चोर्‍या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. या चोर्‍यांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात जुनी डीबी बरखास्त करून सहा पोलीस कर्मचार्‍यांची नवीन डीबी स्थापन करण्यात आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगमनेर शहराबरोबरच परिसरातील गावांचा ही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून या हद्दीमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. शहरामध्ये विविध प्रकारच्या चोर्‍या अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासुन घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आहे. दोन दिवसापूर्वी एका दिवसात एकाच रात्री तब्बल सात ठिकाणी घरफोड्या झालेल्या होत्या.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष झाले होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली डीबी कुचकामी ठरलेली होती. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी डीबीच्या कर्मचार्‍यांनी काम करावे असे अपेक्षित असते. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे ऐवजी या शाखेचे कर्मचारी इतर कामांमध्ये व्यस्त असायचे.

दरम्यान वादग्रस्त ठरलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारी गेल्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली पोलीस निरीक्षक देशमुख यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल मदने यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेऊन शहर पोलीस ठाण्यात नवीन डीबीची स्थापना केलेली आहे.

जुन्या कर्मचार्‍यांना वगळून नवीन सहा कर्मचार्‍यांची नियुक्ती या डीबीमध्ये करण्यात आलेली आहे. शहरातील वाढत्या चोर्‍या रोखण्याचे आव्हान नवीन कर्मचार्‍यांपुढे आहे. हे कर्मचारी आव्हान किती ताकदीने पेलतात त्याकडे अनेकांचे लक्ष आहे. डीबीतून वगळल्यामुळे काही जुने कर्मचारी नाराज झाले असल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कामकाजाकडे डी.वाय.एस.पी राहुल मदने यांनाच लक्ष द्यावे लागत आहे. पोलीस निरीक्षक असतानाही व नसतानाही मदने यांना नियंत्रण ठेवावे लागत असल्याने शहर पोलीस नेमके काय करतात असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत झालेली डीबी चांगले काम करून दाखवेल असा विश्वास अनेकांना आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com