संगमनेर : 130 बँड पथकांतील सुमारे 2 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ

संगमनेर : 130 बँड पथकांतील सुमारे 2 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गेल्या दोन वर्षापासून करोनाचे संकट निर्माण झाल्याने व शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सण उत्सव यावरही याचा मोठा परिणाम झाल्याने याचा थेट परिणाम तालुक्यातील बँड पथकातील कामगारांवर झालेला आहे. तालुक्यातील 130 बँड बॅन्जो पथकातील सुमारे दोन हजार कामगारांना कामच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे अनेक व्यवसाय बंद होते. लॉक डाऊनही प्रदीर्घ काळ सुरू होते. शासनाने कठोर निर्बंध घातल्याने अनेकांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमावरही शासनाने निर्बंध आणल्याने या समारंभाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला आहे.

बँड पथक, ढोल ताशा पथक, बॅन्जो पथक यांना एकेकाळी मोठा व्यवसाय असायचा. यामुळे हा व्यवसाय तालुक्यात चांगला फोफावला होता. तालुक्यात सध्या 130 बॅन्जो पथके अस्तित्वात आहेत. एका पथकात पंधरा ते वीस कामगार काम करत असतात. असे सुमारे दोन हजार कामगार या व्यवसायात कार्यरत आहेत. याच व्यवसायावर अनेकांची गुजराण होत आहे. मात्र करोनामुळे हे व्यवसाय जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोठेही मोठा कार्यक्रम समारंभ नसल्याने वाजंत्रीला आमंत्रणही दिले जात नाही. कामच नसल्याने 2 हजार कामगारांचा रोजगार बुडाला आहे. अनेकजण केवळ याच व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र या व्यवसायातून सध्या रोजगार नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

बॅन्जो, बँड पथकासाठी गणेशोत्सव हा सुगीचा काळ असतो. गणरायाच्या प्रतिष्ठापने पासून विसर्जनापर्यंत बॅन्जो पथकांना मोठा आर्थिक फायदा होत असतो. मात्र या उत्सवावरच सरकारने निर्बंध आणल्याने गणेश प्रतिष्ठापनेची मिरवणूक व विसर्जन मिरवणूक दोन वर्षांपासून बंद झाली आहे. यावर्षीही विसर्जन मिरवणूक निघणार नसल्याने बॅन्जो पथकाचा हा व्यवसाय बुडाला आहे. या कामगारांना शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी या क्षेत्रातील संघटनांनी वेगवेगळ्या अधिकारी व पदाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मात्र या कामगारांची कोणीही दखल घेतली नाही.

शासनाकडून या कामगारांना कुठलाही आर्थिक मदतीचा हात दिला नाही. यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अजून काही महिने करोनाचे संकट असेच राहिले तर हा व्यवसाय मोडकळीस येण्याची शक्यता आहे. हा व्यवसाय सोडून इतर व्यवसाय करण्याच्या मनस्थितीत अनेक कामगार असल्याने भविष्यात बँड पथकांना कामगारांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन या कामगारांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी केली जात आहे.

संघटनेकडून कामगारांना धान्यपुरवठा

दरम्यान कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बँड पथक अध्यक्ष गणेश धामणे यांच्याशी संपर्क साधला असता रोजगारा अभावी आमचे कामगार अडचणीत आले आहे. या कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी आपण स्वतः या कामगारांना गहू, तांदूळ व इतर धान्याची पोती दिली. शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आम्हाला एक पैशाचीही आर्थिक मदत झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com