संगमनेरात एक लाखाची बॅग पळविणारा नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात

संगमनेरात एक लाखाची बॅग पळविणारा नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एक लाख रुपयांची बॅग चोरून पळून जात असलेला अल्पवयीन चोरटा नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील पंचायत समिती परिसरात घडली.

संगमनेर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी आश्वी येथील शिक्षक बँकेतून एक लाख रुपये काढून आपल्या गावी जात होते. सोळा वर्षाच्या एका चोरट्याने या शिक्षकाचा नवीन नगर रोड येथून पाठलाग केला. हे शिक्षक पंचायत समिती जवळील एका शोरूम मध्ये थांबले होते. या चोरट्याने या संधीचा फायदा घेत त्यांची एक लाख रुपये भरलेली बॅग चोरली.

आपल्या जवळील पैशाच्या बॅगची चोरी झाल्याचे लक्षात येताच या शिक्षकाने आरडा ओरड केली. यामुळे गुंजाळनगर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. हा चोरटा बॅग घेऊन पळून जात असताना स्थानिक काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. नगर रस्त्यावरील माऊली कृषी सेवा केंद्र जवळ या चोरट्याला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता औरंगाबाद जिल्ह्यातील आपण रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.

यानंतर नागरिकांनी पोलिसांना कळविले. या चोरीची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या चोरट्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. चोरी झालेले पैसे पोलिसांनी संबंधित शिक्षकाला परत दिले. हा चोरटा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या चोरट्याने नशा केल्याचे नागरीकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com