
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळ व जनसेवा विकास मंडळ अशी लढत झाली. या लढतीत शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणूकीत विखे प्रणित जनसेवा विकास मंडळाचा धुव्वा उडाला आहे. बाजार समितीवर पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आली आहे.
बाजार समितीच्या 18 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी सत्ताधार्यांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली होती. अखेर थोरात-विखे अशी लढत झालीच. तर या निवडणूकीत 9 अपक्षांनी नशीब आजमावले. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ विरुद्ध विद्यमान महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा विकास मंडळ अशी चुरशीची लढत झाली.
यामध्ये शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला. विरोधी जनसेवा विकास मंडळाला खातेही खोलता आले नाही. सर्व उमेदवारांचे डिपॉजीट जप्त झाले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत विखे गटाच्या उमेदवारांना 300 ते 400 च्या पुढे मते मिळविता आली नाही. जनसेवा मंडळाचे महत्वाचे उमेदवार जनार्दन आहेर यांना देखील केवळ 480 मते मिळाली. जनसेवा विकास मंडळाच्या सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूणच तालुक्याच्या सर्वोत्तम सहकाराला मतदारांनी पुन्हा एकदा खंबीर साथ दिल्याचे या निवडणूकीतून दिसून आले. शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
व्यापारी मतदार संघ - निसार शेख -339, मनसुख भंडारी -336.
ग्रामपंचायत मतदार संघ - निलेश कडलग-936, संजय खरात -930, अरुण वाघ-841, सखाराम शेरमाळे -834,
हमाल मापाडी- सचिन कर्पे-90 अपक्ष,
सहकारी संस्था- इतर मागासवर्गीय- सुधाकर ताजणे -1176, महिला मतदार संघ- दिपाली वर्पे - 1181, रुख्मिणी साकुरे - 1166, भटक्या जाती विमुक्त जमाती मतदार संघ - अनिल घुगे -1079,
सोसायटी मतदार संघ- शंकरराव खेमनर -1130, कैलास पानसरे -1094, मनिष गोपाळे -1116, सुरेश कान्होरे -1150, सतिश खताळ -1140, गिताराम गायकवाड -1129, विजय सातपुते -1049