
तळेगाव दिघे | वार्ताहर
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील करुले (Karule) गावांतर्गतच्या कोल्हे वस्ती (Kolhe wasti) शिवारात वनविभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी ( दि. २४) रात्रीच्या सुमारास अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या (Leopard) जेरबंद करण्यात आला होता. त्यापाठोपाठ शनिवारी (दि. २६) सकाळी आहेर वस्ती परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रात्री ८ वाजेच्या सुमारास आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. रहिवाशी व ग्रामस्थांनी बिबट्यास बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
करुले शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर सुरु आहे. शेतकरी व रहिवाशांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते. बिबट्याचे वास्तव्य लक्षात घेता परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर तातडीने उपाययोजना करीत वन विभागाने करुले गावांतर्गतच्या कोल्हे वस्ती शिवारात बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.
दरम्यान गुरुवारी रात्रीच्या सुमारास अंदाजे अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला होता. तरीही बिबट्याचे दर्शन झाल्याने शनिवारी सकाळी पुन्हा पिंजरा लावण्यात आला. रात्री ८ वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या नादात आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. याबाबत कामगार पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक आय. व्ही. जारवाल सहित वन कर्मचारी बाबासाहेब दिघे, संपत ढेरंगे, लहानू आहेर तातडीने आहेर वस्ती येथे येत सदर बिबट्यास निंबाळे येथील रोपवाटिकेत हलविले.
सदर बिबट्यास बघण्यासाठी रहिवासी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. करुले शिवारात आणखी बिबट्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता कामगार पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.