अहमदनगर | Ahmedagar

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून घेऊन जाणार्या संगमनेर येथील एकाला अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकावर अटक केली.

निलेश श्रावण राठोड (वय- 25 रा. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीसह राठोड याला पुढील तपास कामी संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

19 मार्च 2017 रोजी निलेश राठोड याने संगमनेर शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेले होते. पिडीत मुलीच्या घरच्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलिसांना न लागल्याने 3 नोव्हेंबर 2020 रोजी सदर गुन्ह्याचा तपास नगर येथील अनैतिक मानवी वाहतूक शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. निलेश राठोड व पिडीत मुलगी कामधंद्यासाठी पुणे येथे जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस कर्मचारी कांबळे, अर्चना काळे, मोनाली घुटे यांच्या मदतीने राठोड याला माळीवाडा बसस्थानक येथे अटक केली. तर सदर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. जिल्ह्यात सध्या ऑपरेशन मुस्कान ही मोहिम सुरू असून या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पथवे, निरीक्षक बाजीराव पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.