
संगमनेर | तालुका प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहुली येथे कारच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना रविवार (दि १) रोजी सकाळी साडेआठ ते पावने नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे. मनोहर सदाशिव बाळश्राफ वय( ६५) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले यांनी दिलेली माहिती अशी की, डोळासणे गावांतर्गत असलेल्या वरची माहुली येथील मनोहर बाळश्राफ हे रविवारी सकाळी पायी जात होते. त्याच दरम्यान पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली. त्यामुळे बाळश्राफ हे गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना त्याच कारमधून औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आदिनाथ गांधले हे करत आहे. दरम्यान मनोहर बाळश्राफ यांच्या अपघाती मृत्यूने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे.