वृक्ष परिवाराचे प्रवरा नदीपात्रात झोपून 'अभिनव आंदोलन'

वृक्ष परिवाराचे प्रवरा नदीपात्रात झोपून 'अभिनव आंदोलन'

महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात प्रचंड वाळू उपसा

संगमनेर l प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातील वाळू उपसा थांबविण्यासाठी आज सकाळी वृक्ष परिवाराच्या सदस्यांनी प्रवरा नदीपात्रात झोपून अभिनव आंदोलन केले.

प्रवरा माई परिसरात दररोज सकाळी शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी येतात. मात्र नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहे. पर्यावरण प्रेमींनी महसूलकडे वारंवार तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त नागरीकांनी महसूल प्रशासनाला चेतावणी म्हणून हे आंदोलन केले.

या परिसरामध्ये तीर्थ क्षेत्र विकास अंतर्गत नवीन घाटांचे काम व सुशोभिकरण झालेले आहे. नदीपात्रातील बेकायदा वाळू उपसामुळे घाटाची पहिली पायरी व नदीपात्र यामध्ये 4 ते 5 फुटांचे अंतर पडलेले आहे. या परिसरामध्ये संगमनेरचे नागरीक व लहान मुले पाणी असतांना पोहण्यासाठीव परिसराचा आनंद घेण्यासाठी येत असतात. वाळूचे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे काही मुलांचा व नागरिकांचा जीव गेलेला आहे. वाळू उपसामुळे नदी पात्रात विहीरी व पाईप लाईन उघड्या पडल्या आहेत. आजूबाजूच्या विहिरींना पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे मंदीराची स्वच्छता होत नाही. त्याप्रमाणे नदी काठची शेती व ग्रीनरी उध्वस्त झाली आहे. या आधी बेकायदा वाळू उपसा बाबत वेळोवेळी निवेदने देवून आंदोलने होऊनही काही उपयोग होत नाही. तात्पुरती कारवाई होते. कधी कधी दक्षता पथक येवूनही वरील गोष्टींकडे डोळेझाक करते म्हणून आज सकाळी वृक्ष परिवाराच्यावतीने अभिनव आंदोलन केले.

वृक्ष परिवाराचे प्रवरा नदीपात्रात झोपून 'अभिनव आंदोलन'
बेपत्ता असलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह मुळा धरणाच्या पाण्यात आढळला

आडवी नदी ते मोठ्या पुलापर्यंतचा वाळु उपसा त्वरीत बंद करावा, तात्पुरती कारवाई करु नये, नदी पात्रात झालेले खड्डे बुजविण्यात यावेत. वाळू उपसा करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, वाळू उपसा करणार्‍यांची यादी प्रशासनाने प्रसिद्ध करावी, नदीला पाणी असतानाही ट्रक्टरचे ट्युब फुगवून त्यावर गोण्या भरुन त्या घाटाजवळ आणल्या जातात त्या बंद कराव्यात, वाळू उपसाचे हप्तेखोरी त्वरीत बंद करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांना देण्यात आले आहे. निवेदनावर डॉ. राजेंद्र मालपाणी, कुलदिप ठाकुर, निलेश जाजू, ओंकार भंडारी, शिरीष मुळे, राजेंद्र चांडक, मुकुंद गरुडकर, संतोष पवार, कैलास बोरकर, पुनम कासट, मदन पारख, राजाभाऊ भंडारी, प्रकाश वालझाडे, दिपक क्षत्रिय, राजेंद्र सुतार, जगदीश इंदाणी आदिंची नावे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com