
सोनई|वार्ताहर|Sonai
6 जुलै रोजी सोनई पोलिसांनी झापवाडी शिवारातून 115 किलो चंदन जप्त करून आरोपीस अटक केल्यानंतर काल मध्यरात्री घोडेगाव येथे आणखी एक छापा टाकून सराईत गुन्हेगार असलेल्या चांदा येथील दोघा चंदनतस्करांना मुद्देमालासह अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व त्यांच्या सहकार्यांनी घोडेगाव चौफुली येथे सापळा रचून रात्री पावणेदोनच्या सुमारास छापा टाकला. तेथून टाटा झेनॉन कंपनीची पिकअप जीप (एमएच 15ऊघ 4838) ताब्यात घेण्यात आली.
त्यावरील चालक व त्या लगतचे सीटवर बसलेला अशा दोन इसमांना ताब्यात घेऊन वाहनांची झडती घेतली असता दोन्ही आरोपींनी वाहनाच्या मागील कॅरियरचे खालील बाजूस छोटे कप्पे करून त्यामध्ये दडवलेल्या चंदनाच्या लाकडांच्या दोन गोण्या व साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.
यामध्ये टाटा झेनॉन जीपमध्ये एका गोणीत 27 हजार 500 रुपये किमतीची लहान मोठ्या आकाराची सुगंधी चंदनाची 11 किलो वजनाची लाकडे, दुसर्या गोणीत 13 हजार 750 रुपये किमतीची 2500 रुपये प्रति किलोप्रमाणे साडेपाच किलो वजनाची लाकडे पाच लाख रुपये किंमतीची टाटा झेनॉन पिकअप जीप असा एकूण 5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार वाहन मालक बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड (वय 40) व वाहन चालक पोपट जगन्नाथ पुंड (वय 45) दोघेही रा. चांदा ता. नेवासा यांना अटक करण्यात आली. हे दोघेही आरोपी सराईत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाळासाहेब गायकवाड याच्याविरुद्ध सोनई, एमआयडीसी व कोतवाली पोलीस ठाणे तसेच पाथर्डी पोलीस ठाणे आदी ठिकाणी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत तसेच नंबर दोन पोपट पुंड याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात चंदन चोरीचा गुन्हा दाखल आहे.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींना नेवासा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता त्यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार संजय चव्हाण करीत आहेत.
सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय चव्हाण, पोलीस नाईक किरण गायकवाड, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढोले, मृत्युंजय मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे