चंदनतस्कराला चार दिवसांची वनकोठडी

चंदनतस्कराला चार दिवसांची वनकोठडी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत येथील प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील पथकाने चंदन तस्करी करणार्‍या एकाला रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे. कर्जतमध्ये नव्याने दाखल झालेले प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, पकडलेल्या आरोपीला न्यायालयात उभे केले असता त्याला 4 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, (दि. 25) दुपारी 4 वाजेच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनच्या दुरध्वनीवरुन अधिकार्‍यांना कर्जत येथे चंदनाची तस्करी झाली असल्याची गोपनिय माहिती मिळाली. वनपरीक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची खात्री केली. पथकाला एक आरोपी चंदनाच्या मुद्देमालासह आढळून आला. त्यांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्यात आली.

चंदनतस्करी प्रकरणी आरोपी मोइनुद्दीन युसूफ शेख, रा. आंबेडकर गेटसमोर, कर्जत (वय 69) याने अवैधरीत्या चंदनाची लाकडे बाळगल्याने व अवैध वाहतूक केल्याने भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 41,42,52,65,69 अन्वये व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 31,55 चे उल्लंघन झाल्याने वनपरीमंडळमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपीस 26 सप्टेंबर रोजी अटक केली. 27 सप्टेंबर रोजी आरोपीस कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसांची वनकस्टडी दिली आहे.

आरोपीस चंदनाचा पुरवठा कोणी केला व आरोपी सुवासिक चंदन कोणत्या कारखान्यांना देतो याचा तपास सुरू आहे. उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे वनपरीक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले व वनकर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com