
राहाता (तालुका प्रतिनिधी)
राहाता तहसील कार्यालयाच्या वाळू चोरी विरोधी पथकाने गोदावरी नदी पात्रातून शिंगवे हद्दीतून दीड लाख रुपये किंमतीच्या वाळूसह ट्रॉली जप्त केली होती. ती राहाता तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेली असताना ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.
याप्रकरणी राहाता तहसील कार्यालयातील गौणखणिज जमाबंदी महसूल सहाय्यक मुकुंद गोपीनाथ म्हस्के यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या पथकाने तहसीलदारांच्या तोंडी आदेशाने शिंगवे गावातून गोदावरी नदी पात्रातून वाळूने भरलेली निळ्या रंगाची ट्रॉली ११ मे रोजी जप्त केली होती. जप्त करतेवेळी ट्रॉली मालक अथवा ट्रॅक्टरवरील कर्मचारी आढळून आले नव्हते.
स्थानिक तलाठी हरिश्चंद्र कावनपुरे यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीस्तव ट्रॅक्टर ट्रॉली राहाता तहसील कार्यालयाच्या आवारात लावली होती. सदरच्या ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली ही १७ मे २०२२ रोजी रात्री ६.३० ते २० मे २०२२ रोजी सकाळी १० वाजे पर्यंत या कालावधीत वाळूसह ट्रॉली राहाता तहसिल कार्यालयाच्या आवारात ज्या ठिकाणी लावली होती, त्या ठिकाणी आढळून आली नाही. त्यावरुन सदरची ट्रॉली चोरी झाल्याचे लक्षात आल्याने फिर्याद दिली. वाळुसह ट्रॉली दीड लाख रुपये किंमतीची होती. ती चोरीला गेली.
या प्रकरणी राहाता पोलिसांनी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २३१/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे काल अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे हे करत आहेत.