चोरुन वाळू वाहतूक; तहसीलदारांनी ठोठावला 1 लाख 20 हजारांचा दंड

file photo
file photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू लिलाव व वाळू उपशाला बंदी घातलेली असतानाही वाळूची चोरून वाहतूक केली जाते. याविरुद्ध पोलिस व महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सराला गोवर्धन परिसरातून पंचनामा केलेल्या वाळू साठ्यामधून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा टेम्पो कामगार तलाठी यांनी पकडला. याप्रकरणी तहसीलदारांनी श्रीरामपूर येथील एकास 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सरला गोवर्धन परिसरात महसूल विभागाने पंचनामा केलेले वाळू साठ्यामधून विनापरवाना वाळू वाहतूक करतांना टेम्पो क्रमांक एमएच-21- 6639 कामगार तलाठी श्री. पवार यांनी पकडला. याबाबत पंचनामा करून वाळूसह टेम्पो तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला. कामगार तलाठी श्री. पवार यांनी तसा अहवाल श्रीरामपूर तहसीलदारांना दिला. तहसीलदारांनी श्रीरामपूर येथील चंदू आगे याच्यावर 1 लाख 20 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली असल्याची नोटीस बजाविली आहे.

विनापरवाना वाळू वाहतूक करणार्‍या टेम्पोशी माझा काहीही संबंध नाही - आगे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील सराला या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या टेम्पोशी माझा काहीएक संबंध नाही. सदर टेम्पो हा माझ्या नावावर नसतांना माझे नाव त्यात जोडून मला तहसिल कार्यालयामार्फत नोटीस पाठविली आहे, असा लेखी खुलासा चंद्रशेखर आगे यांनी तहसीलदार, श्रीरामपूर यांच्याकडे केला आहे.

या खुलाशात आगे यांनी म्हटले आहे की, मी हिंदुत्वाच्या विचारांवर कार्य करणार्‍या ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’ संघटनेचा कार्याध्यक्ष असून या माध्यमातून सामाजिक तसेच हिंदुत्वाचे काम मी करतो. त्यामध्ये प्रामुख्यांने लव जिहाद, गोहत्या या गंभीर समस्याविरोधात आवाज उठवितो. त्यामुळे कोणीतरी तलाठी सरला गाव यांना माझ्याबद्दल अतिशय चुकीची माहीती देवून, माझी समाजात बदनामी करण्याच्या हेतूने हे सर्व कारस्थान रचले आहे. तरी तहसीलदारांनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असे चंद्रशेखर आगे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com