तोतयागिरी करणार्‍यांविरूद्ध कारवाई करा - मुथा

तोतयागिरी करणार्‍यांविरूद्ध कारवाई करा - मुथा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

प्रवरा नदीमधील वाळूतस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने नेमलेली गस्तीपथके वाळू तस्करांवर कारवाई करण्याऐवजी अनाधिकाराने लाखो रुपयांची लुटमार करीत आहेत. अशी तोतयागिरी करुन शासनाची फसवणूक करणार्‍यांविरुध्द जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी केली आहे.

यासंंदर्भात वरिष्ठांना पाठविलेल्या तक्रारीत मुथा यांनी म्हटले, प्रशासनाने प्रवरा नदीपात्रातील वाळूतस्करीला आळा घालण्यासाठी गस्ती पथके नेमली आहेत. प्रवरा नदीपात्रातील मध्यापासूनचा दक्षिण भाग हा राहुरी तालुका हद्दीत तर उत्तर भाग हा श्रीरामपूर तालुका हद्दीत येतो. असे असताना राहुरी तालुक्यातील महसूल व पोलिसांचे गस्ती पथक कोणताही अधिकार नसताना तसेच वरिष्ठांची रितसर परवानगी न घेता परस्पर शासकीय वाहनाने न येता खासगी वाहनाने श्रीरामपूर हद्दीत येऊन बेकायदेशीरपणे कारवाया करतात.

तसेच काही लोक पोलीस असल्याचे भासवून अधिकार नसताना मारहाणही करतात. वाळू तस्करांच्या गाड्या रात्री अपरात्री अडवून त्यांच्याकडून दमदाटी करुन लाखो रुपयांची खंडणी उकळतात. हा प्रकार अनुचित असून शासनाची फसवणूक करणारा असल्याचे मुथा यांनी म्हटले आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मुथा यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com