
घारगाव |वार्ताहर| Ghargav
संगमनेर तालक्यातील नांदूर खंदरमाळच्या खैरदरा परिसरातील मुळा नदीपात्रात भराव टाकत वाळूमाफियांनी 500 मीटर लांबीचा नियमबाह्य रस्ता महसूलच्या नाकावर टिच्चून तयार केला आहे. नैसर्गिक पाणीप्रवाह अडवून उत्खननाची शक्कल लढवण्यात आल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. वाळू वाहतुकीसाठी मुळा नदीचे स्वरूप बदलून टाकले असून याला महसूल प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
वाळूचे आगार म्हणून ओळख असलेल्या खैरदरा परिसरातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळू उपसा केला जातो. खैरदरा परिसरातून जांबूत मार्गे संगमनेर व पुणे जिल्ह्यात रोज शेकडो वाहने चोरट्या वाळूची वाहतूक करतात. दरम्यान जांबूत खैरदरा परिसरातून अवैधरित्या सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा बंद होण्याकरिता जांबूत बुद्रुक ग्रामस्थांनी विरोध करत नोव्हेंबर 2021 मध्ये महसूल, पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन दिले. ग्रामस्थांच्या विरोधामुळे काहीकाळ वाळू वाहतूक मंदावली. यामुळे वाळू विक्रीकरिता माफिया कासावीस झाले.
त्यांनी पांढर्या सोन्यातून कोट्यवधीची कमाईकरिता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न केला. माफियांनी महसूल आणि पोलीस यांच्या सोबत साटेलोटे करीत खैरदरा परिसरातील मुळा नदीपात्रात 500 मीटर लांबीचा नियमबाह्य भरावा टाकत 6 लक्ष रुपये खर्च करून वाहतुकीसाठी रस्ता तयार केला. त्यामुळे संगमनेर हद्दीतील खैरदरा परिसरातून पारनेरच्या पवळदरा परिसरात वाळूने भरलेल्या ढंपरची वाहतूक राजरोस सुरु झाली. रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात ह्या मार्गे वाळू वाहतूक सुरु आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच हि वाहतूक सुरू झाली असताना महसूल व पोलीस विभागाने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली आहे. गेली अडीच महिन्यापूर्वी नदीपात्रात मुरूम व दगड-गोटाडे टाकत नदीपात्रात 500 लांबीचा भरावा टाकल्याने दोन्ही बाजूने पाण्याचा फुगारा झाला तरी प्रशासन मुग गिळून गप्प असल्याने लोकभावना तीव्र आहेत.
नदीपात्रातील वाळू चोरीच्या प्रकारावर नियंत्रण राखण्यासाठी पात्रालगतच्या शेतातून रस्ते तयार केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शेतकर्यावर प्रशासनाकडून फौजदारी कारवाई केली जाते. वाळू तस्करांनी संगमनेर हद्दीतील खैरदरा परिसरातून पारनेरच्या पवळदरा परिसरात वाळूने भरलेल्या ढंपरची वाहतूक करण्यासाठी मुळा नदीपात्रात भरावाटाकत 500 लांबीचा नियमबाह्य रस्ता तयार केल्याने सबंधित वाळूतस्कारांसह नांदूर खंदरमाळ तलाठी, सर्कल आणि पोलीस पाटील यावर कारवाई होणार का..? असा सवाल लगतच्या शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.