कारवाईच्या भितीने नायगाव येथे वाळूची दोन वाहने पेटविली

कारवाईच्या भितीने नायगाव येथे वाळूची दोन वाहने पेटविली

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अहोरात्र वाळू उपसा सुरू असतोे. श्रीरामपूरसह, वैजापूर, राहुरी तालुक्यातील वाळू तस्कर श्रीरामपूर परिसरातील वाळू तस्करांना हाताशी धरून नायगाव तसेच सराला, गोववर्धन या परिसरातून रात्री बेसूमार वाळू उपसा करतात.

काल नायगाव येथे रात्री गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार प्रशांत पाटील यांना मिळाली. तातडीने पोलीस व महसूल प्रशासन तसेच स्वतः डीवायएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. आधीच महसूलचे काही कर्मचारी व एस. पी. कार्यालयाकडून पाठविलेला स्पेशल पोलीस फोर्सचे कर्मचारी यांनी नदीपात्रात तीन वाळूच्या गाड्या पकडल्या. एक गाडी नदीपात्रातून बाहेर काढून ती पोलीस स्टेशनला आणण्याचे काम सुरू असताना दरम्यानच्या काळात मागे अंधारात दोन वाळूच्या ट्रक कोणीतरी अज्ञात इसमांनी पेटवून दिल्या. त्यामुळे या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थही मोठ्या प्रमाणावर जमा झाले.

याठिकाणी डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळलेल्या वाळू गाड्या व पकडलेली एक वाळू गाडी अशा तीन गाड्या जप्त करून श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पोलीस व महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत प्रथमच रात्रीच्या वेळी गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करणार्‍या गाड्या पकडल्याने वाळूतस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन गाड्या अंधारात जमावाने पेटविल्या? कि वाळू तस्करीमधील स्पर्धेतून त्या पेटविण्यात आल्या? या जळालेल्या डंपरचा मालक कोण आहे? नेमक्या कोणत्या तस्करांच्या या गाड्या आहेत? याचा तपास सुरू आहे. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. तर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घडलेल्या घटनेला दुजोरा दिला.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर वाळू तस्करांच्या वाढत्या दहशतीमुळे नायगाव भागात तातडीने पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी नायगाव ग्रामस्थांनी केली आहे. नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी यापूर्वीच वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com