ग्रामस्थांनीच वाळू तस्करांविरुद्ध पुढाकार घ्यावा-प्रांतधिकारी डॉ. मंगरुळे
सार्वमत

ग्रामस्थांनीच वाळू तस्करांविरुद्ध पुढाकार घ्यावा-प्रांतधिकारी डॉ. मंगरुळे

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

वाळूतस्करी विरोधात महसूल विभाग कारवाई करतोच आहे, मात्र ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेऊन कारवाई केली पाहिजे, ग्राम सुरक्षा समितीची देखील जबाबदारी आहे, ग्रामस्थांनीच कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर वाळू तस्करांची काय हिंमत आहे वाळू उपसा व वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे आवाहन संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.

सध्या तालुक्यातील प्रवरा नदीपात्रालगतच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत आहे. धांदरफळ खुर्द शिवारापासून ते ओझरपर्यंत नदीपात्र पोखरण्याचे काम वाळू तस्करांकडून होत आहे. याबाबत प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत.

मात्र 24 तास महसूलचे अधिकारी जर या वाळूमध्येच अडकले तर इतर कामे कधी होणार? त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांनी एकत्र आले पाहिजे. शासनाने ग्रामपंचायतींना अधिकार दिलेले आहेत. वाळूचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल बरोबरच ग्रामपंचायतीची देखील आहे. ग्रामपंचायत वाळूचा लिलावाचा ठराव करू शकते, जर लिलाव करायचा नसेल तर त्या वाळूचे रक्षण करण्याची जबाबदारी ग्राम सुरक्षा समितीची आहे. वाळू चोरीला गेली तर निसर्ग साधन संपत्तीचे नुकसान होणार आहे.

पाण्याची पातळी खोलवर जाईल, हे ग्रामस्थांनी देखील लक्षात घेतले पाहिजे. लोकांनी केवळ वाळू तस्करांचे शुटींग करू नये, तर त्यांना वाळू तस्करी करत असताना पकडून ठेवावे, महसूल, पोलीस प्रशासनाला कळवावे, माहिती मिळताच प्रशासन कायदेशिर कारवाई करण्यास तत्पर आहे.

असे झाल्यास वाळू तस्करांची काय हिंमत आहे वाळू उपसा करण्याची. पण ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे सांगत डॉ. मंगरुळे म्हणाले, प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा पथक आहे. त्यांनी तत्पर व्हावे, ग्रामस्थांनी एकत्र यावे, वाळूचा एक कण देखील उचलू दिला जाणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी जर केला तरच वाळू तस्करांवर वचक बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Deshdoot
www.deshdoot.com