पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगावात पुन्हा एकदा तराफ्याद्वारे अनधिकृत वाळू तस्करी सुरू झाली असून महसूल विभागाला याची माहिती

मिळताच गुरुवारी सकाळी पुनतगाव शिवारात थेट कारवाई करत महसूल विभागाने हा तराफा जाळून नष्ट केला. महसूलच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

पुनतगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात पाणी असल्याने वाळू तस्करांकडून बोटीने (थर्माकोल तराफा) वाळू उचलली जाते. महसूल विभागाला या वाळूचोरीच्या घटनेची कुणकुण लागताच त्यांनी थेट कारवाई केली. नदीपात्रात पाणी असल्याने वाळू उचलण्यासाठी जागा नसल्यामुळे बोटीचा (थर्माकॉल तराफा)चा वापर केला जातो.

पाण्यातून ही वाळू उपसून नदी काठावर साठविण्यात येत होती. त्यानंतर ती वाहनात भरून विकली जात होती. या घटनेची खबर लागताच महसूल विभाग आणि पुनतगाव ग्रामस्थ यांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी दुपारी एक बोट(तराफा) पेटवून दिली. मात्र तस्करांनी अर्धवट जळत असलेली ही बोट विझवत खुपटी शिवारात ओढून नेली.

या वाळू चोरीच्या घटनेचा महसुलकडून रितसर पंचनामा करण्यात आला आहे. तब्बल 110 ब्रास वाळूची अनधिकृतरीत्या वाहतूक करण्यात आलेली असल्याचा ठपका सदर पंचनाम्यात ठेवण्यात आला आहे. या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. गुरुवारच्या कारवाई दरम्यान नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली पुनतगावचे तलाठी गणेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.