वाळू तस्करांकडून मंडलाधिकार्‍याची धुलाई, कर्‍हे घाटातील घटना

वाळू तस्करांकडून मंडलाधिकार्‍याची 
धुलाई, कर्‍हे घाटातील घटना

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

वाळू तस्करांच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील एका मंडलाअधिकार्‍याची वाळूतस्करांनी येथेच्छ धूलाई केल्याचे वृत्त आहे. बड्या राजकीय नेत्याच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटविण्यात आल्याने ही घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलीच नाही.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो. या व्यवसायामध्ये अनेकांचा सहभाग आहे. अनेकदा महसूल कर्मचार्‍यांच्या समोरून वाळूची वाहने ये -जा करत असतात. मात्र या कर्मचार्‍यांचे या वाहनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. वाळूतस्करांनी याचा चांगलाच फायदा घेतला असून त्यांची तालुक्यात मुजोरी वाढली आहे. यामुळे अनेकदा मारहाण व दमदाटीच्या घटना घडत असतात.

शनिवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील कर्‍हे घाटातून एका डंपर मधून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती एका मंडल अधिकार्‍यांना समजली. या अधिकार्‍याने या घाटामध्ये डंपरला अडविले. मात्र या डंपरमध्ये वाळूची वाहतूक होत होती. याठिकाणी काही वाळूतस्कर व या अधिकार्‍यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. वाळूतस्करांनी या अधिकार्‍याची चांगलीच धुलाई केली. यानंतर हे वाळू तस्कर तेथून पसार झाले. यातील काही वाळू तस्करांनी एका राजकीय पदाधिकार्‍यांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला.

या पदाधिकार्‍यांनी घटनेचे सर्व व्हिडिओ डिलीट करा असे आदेश दिले. नेत्याने मध्यस्थी केल्याने या प्रकरणावर पडदा पडला. महसूल कर्मचार्‍यांमध्ये या घटनेची दोन दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे. हा अधिकारी व त्याला मारहाण करणारे वाळू तस्कर कोण याबाबत उलटसुलट चर्चा होत होती. महसूल खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्‍याने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असतानाही त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

नेत्या सोबतच्या नाते संबंधामुळे कारवाई नाही

महसूल खात्यातील एका जबाबदार अधिकार्‍याला मारहाण होऊनही संबंधित वाळू तस्करा विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. सामान्य माणसाने ही मारहाण केली असती तर त्याच्याविरुद्ध लगेच शासकीय कामात अडथळा आणणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असता मात्र या प्रकरणात एकाही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय पक्षाच्या पदाधिकारी सोबत असलेल्या नातेसंबंधामुळेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.