श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जात आहे. यास विरोध करणार्या तालुक्यातील

मालुंजा येथील उपसरपंचाच्या पतीस वाळूतस्करांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी सखाहरी सदाशिव शेंडगे यांना उपचारासाठी नगरला हलविण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे. दरम्यान याप्रकरणी विरोधी गटानेही फिर्याद दाखल केल्याने तालुका पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद केली आहे.

जिल्हाधिकारी यांचा आदेश व तहसीलदारांच्या सूचनेवरून मालुंजा बुद्रुक येथील प्रवरा नदीपात्रातील वाळू लिलावाची प्रक्रिया नव्याने सुरू होणार असल्याने त्यापूर्वी गावची संमती आहे किंवा नाही यासाठी गेल्या महिन्यात सरपंच अच्युतराव बडाख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामससभेत जर आपल्या गावातील वाळू लिलाव झाला तर गावचे मोठे नुकसान होणार आहे.

नदीमध्ये गावची पाणीपुरवठ्याची विहीर आहे. तसेच परिसरात शेतकर्यांच्या विहिरी आहेत. वाळू उपसा झाला तर क्षारयुक्त पाणी विहिरीत उतरते. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. आपले प्रपंच शेतीवर अवलंबून आहेत. भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे वाळू लिलावास विरोध करण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. त्यानंतर महसूलच्या अधिकार्यांनी लिलाव करायचा नसेल तर वाळू चोरी होणार नाही याची जबादारी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी घ्यावी असे सांगितले होते.

वाळू चोरी होवू नये म्हणून ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी कामगार तलाठी व ग्रामसेवकांना सोबत घेवून नदीपात्राकडे जाणार्या रस्त्यावरील गेटला कुलूप लावले. मात्र गावातीलच काही जणांनी हे कुलूप तोडून बैलगाडीतून वाळू वाहतूक सुरु केली. त्यामुळे हे कुलूप तोडणाराविरुध्द पोलिस व महसूल विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी घेतला.

आपल्या विरोधात तक्रार करणार असल्याचे समजताच सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बाळासाहेब नाना बडाख हे आपल्या घरासमोर असताना आरोपी रोहिदास निवृत्ती गायकवाड, गंगा शाहू गायकवाड, अजय गायकवाड, सर्व रा. मालुंजा हे तेथे आले. त्यांनी तू आमच्या विरोधात तक्रार करतो काय असे म्हणून शिवीगाळ केली व आमच्या नादी लागला तर जिवे ठार मारू टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी बाळासाहेब बडाख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी वरील तीन आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

काल दुसर्या दिवशी (मंगळवार) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रकाश भिमाजी गायकवाड, संजय गायकवाड, अशोक शाहू गायकवाड, गंगाधर शाहू गायकवाड, सर्व रा. मालुंजा, ता. श्रीरामपूर हे एकत्र आले त्यांनी आम्ही ग्रामपंचायतीच्या गेटचे कुलूप तोडले नसताना तू माझे नाव सांगून माझी बदनामी करतो.

असे म्हणून आरोपींनी फिर्यादी सखाहरी सदाशिव शेंडगे (उपसरपंच सौ. अंजनी शेंडगे यांचे पती) यांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलिसांनी वरील चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान प्रकाश भिमा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझी बदनामी का करता असे विचारण्यासाठी गेलो असता त्याचा राग येवून आरोपी बाळासाहेब नाना बडाख व सचीन बाळासाहेब बडाख यांनी आपणास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील दोन आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.