वाळूतस्करांवर भांबोर्‍यात कर्जत पोलिसांची कारवाई

तिघांना अटक, यांत्रिक बोट बुडवली, सक्शन पंप ताब्यात
वाळूतस्करांवर भांबोर्‍यात कर्जत पोलिसांची कारवाई

कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या बोटीवर आज सकाळी साडेअकरा वाजता कर्जत पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत एक सक्शन पंप ताब्यात घेतला असून एक यांत्रिक बोट या कारवाईत बुडविण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना पहाटे 4 वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सिध्दटेक - भांबोरा परिसरातील भीमा नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे.

गायकवाड यांनी तात्काळ कारवाईसाठी पोलिसांचे पथक रवाना केले. पथकाला भांबोरा याठिकाणी भिमा नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस पथकाने पाण्यात उतरून केलेल्या कारवाईत एक यांत्रिक बोट पाण्यात बुडवली व एक सक्शन पंप ताब्यात घेऊन कर्जत पोलीस स्टेशनला आणण्यात आला. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सागर म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 439, 379, 34 व पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस कॉन्स्टेबल सागर म्हेत्रे, सुनील खैरे, मनोज लातुरकर, होमगार्ड निकत, गवळी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com