
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील शहाजापूरच्या सरपंचाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणारा वाळूतस्कर योगेश संजय कोळपे व त्याचा साथीदार गणेश शिवाजी नवले याच्या मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.
शहाजापूरचे सरपंच सचिन भाऊसाहेब बाबळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शाहजापूर-पाथरे सिन्नर रस्त्यावर वडिलोपार्जीत शेती आहे. रविवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता शेतातून घराकडे परत येत असताना पाथरे रोडवर एका वाळू डंपर चालकाने माझे अंगावर गाडी घातली. मी मोटारसायकल बाजुला घेतली. त्यानंतर मी डंपरच्या पाठीमागे गेलो असता, चालकाने डंपर थांबवला व म्हणाला तुला माहीत नाही का डंपर कोणाचा आहे. तुझ्या बापाचा रस्ता आहे का? त्यावर मी त्यास म्हणालो. तुम्ही वाळूचे डंपर हळू चालवत जा. त्याने शिवीगाळ करून हायवा डंपर हा योगेश संजय कोळपे, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव याचा आहे.
काय करायचे ते करून घे असे म्हणून माझे नाव गणेश शिवाजी नवले, रा. कोळगावथडी, ता. कोपरगाव असे सांगून मला चापटीने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तेथे पांढर्या रंगाची व काळ्या काचेची स्कॉर्पीओ गाडी (क्रमांक एम एच 15 एफ.एफ. 7004) आली. या गाडीमधून योगेश कोळपे व त्याच्यासोबत दोन अनोळखी व्यक्ती गाडीच्या खाली उतरले. योगेश कोळपे मला म्हणाला, तुला लई माज आला आहे का? तू सरपंच असशील तुझ्या गावचा, तुला माहीत आहे का माझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत.
मी कोणाला घाबरत नाही, माझ्या नादाला लागशील तर तुझ्या घरी येऊन तुला मारून टाकील अशी धमकी देवून शिवीगाळ केली व त्याने मला तोंडावर पोटावर हाताने व बुक्क्याने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. ते दोघेही मला तुला मारूनच टाकतो असे म्हणून मारहाण करत होते. मी खाली पडलो त्यावेळी माझे अवतीभोवती त्या चौघांनी गराडा घातला. मी पूर्ण घाबरून गेलो होतो. योगेश कोळपे म्हणाला तुला आज संपून टाकतो, असे म्हणून त्याने त्या ठिकाणचा एक मोठा दगड घेऊन माझ्या तोंडावर टाकणार तेवढ्यात मी माझे तोंड बाजूला केले. त्यावेळी तेथे प्रकाश देशमुख, शिवाजी कोळपे यांनी मला सोडवले. त्यानंतर वाबळे यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या तक्रारीवरून गणेश शिवाजी नवले व योगेश संजय कोळपे यांच्याविरूद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं. 479/ 2023 भादंवि कलम 307, 504, 506, 34 प्रमाणे आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार बाळासाहेब मुळीक, पो.कॉ. रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांनी कोळपेवाडी येथे येऊन योगेश संजय कोळपे व गणेश शिवाजी नवले यांच्या मुसक्या आवळल्या.