वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल - ना. विखे

वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल - ना. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रीया वेगाने सुरू झाली असून, सामान्य नागरिकांसह घरकुलांना वाळूची उपलब्धता होत आहे. सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसांत वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ना. विखे यांनी, श्रीरामपूर येथे महसूल अधिकार्‍यांकडून नायगाव येथील वाळू विक्री केंद्रासंदर्भात आढावा घेतला. पंधरा हजार ब्रॉस वाळू इथे उपलब्ध झाली असून आतापर्यंत 237 ब्रॉस वाळू घरकुलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री विखेपाटील म्हणाले की, सुरूवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या. अधिकारी, कर्मचारी यांच्यादृष्टीने नवा विषय होता. परंतु आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. या धोरणासाठी तयार केलेले अ‍ॅप्स आणि टोल फ्री क्रमांकही सुरू झाले असून, धोरणाच्या अंमलबजावणीत येत्या पंधरा दिवसांत अधिक सुसूत्रता येईल.

काही ठिकाणी झालेल्या विरोधावर भाष्य करताना मंत्री विखेपाटील म्हणाले, या धोरणाला नागरीकांचा विरोध नाही. यापूर्वी वाळू माफीयांकडून गावाला त्रास झाला. या व्यवसायाने गुन्हेगारी वाढली, ती पुन्हा नको, ही त्यांची भावना आहे. जनतेच्या भावनेच्या विरोधात जाऊन शासन काही करणार नाही. परंतु अंमळनेर येथील ग्रामस्थांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेपही झाला हे सुध्दा दुर्लक्षित करता येणार नाही. या ग्रामस्थांशी मी स्वत: जाऊन चर्चा करणार असल्याचे नमूद करून येथे वाळू केंद्र झाले नाहीतर या भागातील इतर नागरिकांना अधिक दूरवरून वाळू आणावी लागेल. त्यांचा वाहतूक खर्चही वाढेल, ही दुसरी बाजू सुध्दा विचारात घेण्याची गरज मंत्र्यांनी बोलून दाखविली.

जनतेच्या हितासाठी हे धोरण तयार केले असल्याने जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच गेली अनेक वर्षे वाळू व्यवसाय माफीयांच्या वर्चस्वाखाली होता. शासकीय यंत्रणेलाही या व्यवसायाने पोखरले होते. आता कायद्याच्या चौकटीत धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. यापुर्वी सर्व बेकायदेशीर सुरू होते. आता जलसंपदा विभागालाही यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याने नव्या वाळू धोरणातून काहीतरी चांगले घडविण्याचे प्रयत्न जनतेच्या मनातील सरकारचे आहेत. येणार्‍या काही दिवसांत या धोरणाची यशस्वीता चांगल्या पध्दतीने समोर येईल, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीवर बोलताना मंत्री विखेपाटील म्हणाले की, कर्नाटक राज्यात ज्यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझीट वाचवता आले नाही ते काय तिसरा पर्याय देणार? त्यांच्या वज्रमुठीला केव्हाच तडे गेले आहेत. आता तेच एकमेकांना मूठ मारतील, अशी खोचक प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com