वाळूची ऑनलाईन नोंदणी आता सेतू केंद्रांद्वारे करता येईल - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सर्वसामान्य नागरीकांना वाळू 600 रु प्रती ब्रास या दराने वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने महाखनिज प्रणालीवर वाळूची नोंदणी करणे गरजेचे असून ही ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी आपआपल्या गावातील सेतू केंद्रांद्वारे करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननास व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री साठवणूक तसेच विक्री व्यवस्थापन याबाबत सर्वंकष धोरण शासन स्तरावर राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे वाळू डेपो उभारण्यात आला आहे. वाळू डेपोमध्ये पुरेसा वाळूसाठा नायगाव व मातुलठाण येथील मंजूर वाळू गटातून करण्यात आला आहे. काल सोमवार दि. 15 मे 2023 पासून नायगाव वाळू डेपोमधून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाळू 600 रुपये प्रती ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन पध्दतीने वाळू नोंदविताना रेशनकार्ड, आधार कार्ड, घरकूल प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, इ. कागदपत्रे व मोबाईल क्रमांक अनिवार्य आहेत. तसेच घरकूल योजनेतील लाभार्थी यांना 5 ब्रास मोफत वाळू मिळेल तसेच इतरांसाठी 600 रुपये प्रती ब्रास किमतीने 10 ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. सर्वांना वाळूची नोंदणी करतांना 25 रुपये प्रती नोंदणी फी सेतू केंद्रात भरणा करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर 15 दिवसांत वाळू डेपोतून वाळू उपलब्ध होईल.

नोंदणीनंतर बुकींग आयडी असलेली पावती सेतू केंद्रामधून प्राप्त करून ती पावती वाळू डेपोवरील डेपो मॅनेजरला दाखवून वाहतूक पावती (शढझ) प्राप्त करून घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी धारकाची राहील. वाळू डेपोपासून वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनांची नोंदणी सेतू केंद्रातून करण्यात येईल. सदर वाहनांना ॠझड यंत्रणा बसविणे आवश्यक राहील.

ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी आपआपल्या गावातील सेतू केंद्रांना भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com