वाळू माफियांवरील कारवाई ठरली फार्स, मुळा पात्रातून पुन्हा वाळूउपसा सुरू

वाळू माफियांवरील कारवाई ठरली फार्स, मुळा पात्रातून पुन्हा वाळूउपसा सुरू

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील खैरदरा परिसरातील नदीपात्रामध्ये भराव टाकून रस्ता तयार केल्या प्रकरणी महसूल विभागाने शुक्रवारी (18 फेब्रुवारी) दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र दोन दिवस होत नाही, तोच त्याच परिसरातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून पुन्हा वाळू उपसा सुरू झाला आहे.

महसूल विभागाने दोन दिवसांपूर्वी खैरदरा परिसरात केलेली कारवाई फार्स असल्याची टीका स्थानिकांनी केली. ती आता खरी ठरत असून मुळापात्रातून सर्रास वाळूउपसा सुरूच आहे. पठारभागातून जाणार्‍या मुळापात्रातील नांदूर खंदरमाळ परिसरातील नदीकाठच्या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा होतो. मुळा पात्रात वाळू मुरूम टाकून नैसर्गिक नदीपात्रामध्ये भराव तयार करून मुळा पात्राचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणी महसूल विभागाने दोन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही परिसरातील अन्य वाळू तस्करांवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. रविवार (20 फेबु्रवारी) दुपारी लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून जे.सी.बी मशिनच्या सहाय्याने पुन्हा वाळूउपसा सुरू होता. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी विरोध करताच वाळू तस्करांवर जे.सी.बी मशिन घेऊन नदीपात्रातून पळ काढला.

महसूल अधिकारी अधूनमधून कारवाई करत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात हाती काही लागत नाही आणि वाळू चोरीही थांबत नाही, अशी परिस्थिती आहे. पथक येणार असल्याची माहिती चोरांना आधीच मिळते, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची संधी मिळत असल्याचेही गावकरी सांगतात. साखळीबद्ध पद्धतीने ही चोरी सुरू असते, या साखळीला छेद देऊ पाहणार्‍यांवर कारवाई होत असल्याचा गावकर्‍यांचा अनुभव आहे. त्यामुळे कोणी तक्रारी केल्या तरीही प्रशासन दखल घेत नाही. अर्थात केवळ अधिकारीच नव्हे तर राजकीय व्यक्तींचेही या व्यवसायातील मंडळींना पाठबळ मिळत असल्याचेही सांगण्यात येते. कारवाई करण्याची वेळ आली तरीही अशा व्यावसायिकांवर जुजबी कारवाई केली जाते, तर कधी नेत्यांचा फोन आला तर कारवाई टाळली जात असल्याचीही उदाहरणे घडतात. यंत्रणेला हाताशी धरून फुकटातील वाळू उचलून ती महागड्या दराने विकण्याची कला या भागातील वाळूचोरांमध्ये अवगत असल्याने वाळूचे लिलाव घेतले जात नाहीत, त्यामुळे त्यातून सरकारला मिळणारा महसूल बुडत आहे.

विहिरीची पाण्याची पातळी खालावली

नांदूर खंदरमाळ शिवारातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने परिसरातील, विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. तसेच कूपनलिकांमध्ये टाकलेल्या पिव्हिसी पाईपांना देखील तडे गेले असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com