
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीर वाळू उपसा बाबत कठोर भूमिका घेतली असली तरी संगमनेर तालुक्यात मात्र खुले आम वाळूचा उपसा सुरूच आहे. नदीपात्रामधून वाळूचा उपसा सुरू असतानाही महसूल खात्याच्या अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने महसूल मंत्र्यांच्या आदेशाला या अधिकार्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
संगमनेर तालुक्यातील मुळा व प्रवरा या दोन नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत आहे. तालुक्यातील नदी पात्रा लगतच्या गावातून अनेक वाळूतस्कर वाळूचा बेकायदेशीर उपसा करत आहे. नद्यांना पाणी असतानाही आधुनिक साधनसामुग्रीचा वापर करून वाळू उपसा सुरूच आहे. लिलाव झालेला नसतानाही अनेकदा वाळू उपसली जाते.
राज्यातील सत्तांतरानंतर महसूल मंत्री पद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आले. या पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी वाळू बाबत कडक भूमिका घेतली. यामुळे काही दिवस संगमनेर तालुक्यातील वाळू उपसा बंद होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बेकायदेशीर वाळूचा सुरू झाला आहे. तालुक्यातील धांदरफळ, निमज मंगळापुर, खांडगाव, संगमनेर खुर्द, जोर्वे, निंबाळे आदी नदीपात्रा लगतच्या गावामधून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत आहे.संगमनेर तालुक्यातील महसूल अधिकार्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार हे रजेवर होते तसेच ग्रामपंचायत निवडणुका सुरू झाल्याने याचा वाळू तस्करांनी गैरफायदा घेतला आहे. रात्री नदीपात्रातून ते वाळू उपसा करत आहे.
महसूल मंत्र्यांनी वाळू उपसा बाबत खंबीर भूमिका घेऊन संबंधित अधिकार्यांना याचा जाब विचारावा, व महसूल खात्याचा दबदबावा वाढवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
संगमनेर तालुक्यातील वाळू उपसा बाबत स्थानिक अधिकारी कारवाई करताना दिसत नसल्याने काही जागृत नागरिकांनी नाशिक येथील महसूल आयुक्तांकडे याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या. जिल्हाधिकार्यांना आदेश देतो असे सांगून महसूल आयुक्त टोलवाटोलवी करत असल्याची चर्चा आहे. संगमनेर तालुक्यातील वाळू उपसा बाबत अधिकार्यांचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.