
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नांदगाव (ता. नगर) शिवारात देव नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. दुसरा साथीदार पसार झाला आहे. मंगळवारी (दि. 4) दुपारी साडे तीन वाजता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरी व पर्यावरण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याबापू जगन्नाथ निकम (वय 32) व भोर्या उर्फ सुभाष रामदास निकम (दोघे रा. शिंगवे ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोन्याबापू जगन्नाथ निकम याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीचा एक डंपर जप्त करण्यात आला आहे.
नांदगाव शिवारातील देव नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून डंपरच्या सहाय्याने त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाला खात्री करून पंचासमक्ष कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता नदीपात्रात छापा टाकला असता सोन्याबापू जगन्नाथ निकम हा वाळू वाहतूक करताना डंपरसह मिळून आला. सुभाष रामदास निकम हा पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.