वाळू लिलावासंदर्भात महसूल अधिकार्‍यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून निर्णय घ्यावा

वाळू लिलावासंदर्भात महसूल अधिकार्‍यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून निर्णय घ्यावा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा येथील ग्रामपंचायतीने वाळू लिलावाच्या संदर्भात विशेष ग्रामसभा आयोजित केलेली होती. या ग्रामसभेमध्ये तलाठी दिलीप कुसळकर यांनी वाळू लिलावाच्या संदर्भाचे शासन परिपत्रक वाचून दाखवले. रस्ता खणलेला असताना वाळू वाहतूक दिवसा जोरात चालू आहे. मात्र लिलाव घेण्यास कोणीही तयार नाही. त्यापेक्षा प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी स्वतः येऊन ग्रामसभेत उपस्थित राहावे व वाळू लिलाव संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहासराव वहाडणे यांनी मांडली.

ग्रामसभा घेण्यापूर्वी गावात दवंडी पिटवावी. वाळू वाहतुकीमुळे रस्ते खराब झालेले आहेत. आजपर्यंत किती डंपरवर कारवाई झाली? असेही वहाडणे म्हणाले. पुणतांबा पट्ट्यातील सगळ्या ठिकाणच्या वाळूचा लिलाव झाला पाहिजे, असे मत सुभाष वहाडणे यांनी मांडले. वाळूचा लिलाव आपण ग्रामपंचायतमार्फत करू शकतो पण घेण्यास कोणी तयार होत नाही. वाळू संरक्षणाचा मुद्दा आला की कोणीही जबाबदारी घेत नाही असे मत मुरलीधर थोरात यांनी मांडले. सर्व संमतीने ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात तहकूब करण्यात आली.

पुढच्या ग्रामसभेचे आयोजन प्रांत तहसीलदार व कलेक्टर आल्यावरच वाळू संदर्भात ग्रामसभा होईल असे मंडल अधिकारी आदिक के. एन. यांनी सांगितले. या ग्रामसभेला सरपंच डॉ. धनंजय धनवटे, ग्रामविकास अधिकारी आदिनाथ कडलग, तलाठी दिलीप कुसळकर, उपसरपंच योगेश घाटकर, रवी लुंपाटकी, नामदेव धनवटे, डॉ. अविनाश चव्हाण, सुनील थोरात, अरुण बाबरे यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com