
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
वाळूच्या लिलावासाठी भरलेले पैसे परत मिळत नसल्याने संतापलेल्या एका वाळू व्यावसायिकाने तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचार्यांसोबत अरेरावीची भाषा वापरली. यावेळी नायब तहसीलदार व या वाळू व्यावसायिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील नदीपात्रातील वाळू लिलावात या वाळू व्यावसायिकाने पैसे भरले होते. या लिलावात भरलेल्या रकमेंपैकी जवळपास साडेसहा लाख रुपये त्याला तहसील कार्यालयाकडून घेणे होते. हे पैसे मिळावे यासाठी त्याने वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारले. जवळपास सहा महिन्यांपासून तो तहसील कार्यालयात पैसे मागण्यासाठी येत होता. मात्र त्याचे पैसे मिळाले नव्हते. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो पुन्हा तहसील कार्यालयामध्ये आला.
तहसील कार्यालयातील संबंधित विभागाचे काम करणार्या एका महिला कर्मचार्याकडे त्याने पैशाबाबत उशीर का होत आहे याबाबत विचारणा केली. त्याला समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने त्याने या महिला कर्मचार्यांसोबत अरेरावीची भाषा वापरली. यामुळे तहसील कार्यालयात काही वेळ गोंधळ उडाला. याची माहिती समजल्याने नायब तहसीलदार हे आपल्या कार्यालयाच्या बाहेर आले. त्यांनी वाळू व्यवसाय करणार्या बरोबर चर्चा केली.
यावेळी नायब तहसीलदार व या वाळू व्यवसाय करणार्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आपल्या मुलाची फी भरावयाची असल्याने माझे पैसे मला त्वरित मिळावे असे त्याने सांगितले. यानंतर हा विषय तहसीलदारांपर्यंत पोहोचला. पैसे परत न मिळाल्यास आपण कायदेशीर कारवाई करू असा इशारा या वाळू व्यवसाय करणार्याने दिला आहे.