
मुंबई | Mumbai
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांत सातत्याने चकमक उडत आहेत. अशीच चकमक बुधवारी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात घडली. त्यानतंर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एक मागणी केली. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केली अन् त्यानंतर सभागृहात खसखस पिकली.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी सभागृहात वाळू-रेती लिलावावर विविध प्रश्न उपस्थित केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे दोन्ही नेते एकाच जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात या प्रकरणी प्रदीर्घ प्रश्नोत्तरे रंगली. अखेर, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या जागेवरून उठून अध्यक्षांना उद्देशून एक प्रश्न विचारला. वाळूच्या संदर्भात अनेकदा सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.
हा प्रश्न राज्याच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मातब्बर नेते आहेत. ते एकाच जिल्ह्यातील आहेत. एकमेकांचे शेजारीही आहेत. त्यामुळे तुम्ही इतरांना बोलावण्यापेक्षा केवळ थोरातांना बोलावून हा प्रश्न मार्गी लावाल का? असा माझा प्रश्न राधाकृष्ण विखे यांना आहे, असे अशोक चव्हाण विधानसभा अध्यक्षांना उद्देशून म्हणाले.
त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही सूचना स्वागतार्ह असल्याचे नमूद करत त्यांच्या विनंतीला मान दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे दोन्ही नेते एकत्र बसले तर दुसरा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी कोपरखळी हाणली आणि त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली.