पाथर्डी-शेवगाव शहरांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नांना यश
पाथर्डी-शेवगाव शहरांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
आमदार मोनिका राजळे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पाथर्डी शहर पाणीपुरवठा योजना प्रल्पासाठी 73 कोटी 47 लाख व शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनांसाठी 67 कोटी 27 लाख रुपयांच्या स्वतंत्र योजनांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाथर्डी व शेवगाव शहराला सध्या पाणी पुरवठा करणारी पाथर्डी शेवगाव व 54 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अत्यंत जुनी झाल्याने शेवगाव व पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आमदार मोनिका राजळे ह्या 2018 पासून या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर विकास विभाग असताना या पाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यावेळी तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून पाथर्डी व शेवगाव शहरांसाठी च्या योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली होती.

मात्र मार्च 2020 मध्ये कारोनामुळे या योजनांना विलंब होत गेला, प्रकल्पाच्या किमतीत बदल होऊन मोठी वाढ होत गेली, त्यामुळे या दोन्ही योजनांची अंदाजपत्रके पुन्हा पुन्हा तयार करावी लागली, मागील सहा महिन्यांपासून आमदार मोनिका राजळे व दोन्ही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून योजना होणे किती आवश्यक आहे हे त्यांचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आज प्रत्यक्षात तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर व विविध अडचणी पार पाडून शेवगाव व पाथर्डीला शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. पत्रकार परिषदेला पाथर्डी तालुका शिवसेना प्रमुख अंकुश चितळे व शेवगाव तालुका शिवसेना प्रमुख अविनाश मगरे हे उपस्थित होते.

दोन्ही शहरांमध्ये आनंद

शेवगाव व पाथर्डी शहरासाठी स्वतंत्र नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने दोन्ही शहरामध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण असून या योजना मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे खूप सहकार्य मिळाल्याचे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com