शिर्डी बाह्यवळण रस्त्याच्या कामास मंजुरी

शिर्डी बाह्यवळण रस्त्याच्या कामास मंजुरी

आ. राधाकृष्ण विखे यांचा पाठपुरावा, जिरायत टापूत समाधान

अस्तगाव (वार्ताहर) -

केलवड ते पिंपरी निर्मळ या दरम्यान शिर्डी बायपासची दयनिय अवस्था झाली होती. या रस्त्याच्या कामास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून 15 कोटी रुपये मंजुर झाले असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे संचालक सुनिलराव गमे यांनी दिली.

शिर्डी व राहाता शहरातील नगर-मनमाड मार्गावरील वाहतुकीचा ताण पाहता, आ. विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शिर्डी बायपास करण्यात आला आहे. हा बायपास शिर्डी, राहाता शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी झाला असला तरी या बायपासमुळे खडकेवाके, केलवड, कोर्‍हाळे, डोर्‍हाळे, वाळकी, नांदुर्खी, निमगाव, पिंपरी निर्मळ, पिंप्री लोकई, आदी गावांसाठी वरदान ठरत आहे. ही गावे मुख्य प्रवाहात आली आहेत.

या बायपासचे काम करण्यात आले होते. परंतु काही ठिकाणी प्रचंड खराब झाला होता. निधीची मोठी अडचण आणि जड वाहतूक यामुळे रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनांना मोठी कसरत करत चालावे लागत असे. रस्त्याच्या कामासाठी व निधी मिळविण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी कायम पाठपुरावा केला. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात 15 कोटी रुपये या बायपाससाठी मंजुर करण्यात आले आहेत. याचे श्रेय आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना जाते.

या बायपाससाठी नुकत्याच निविदाही निघाल्या आहेत. लवकरच या रस्त्याच्या कामास प्रारंभ होणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर या भागातील वाहन धारकांची आणि जड वाहतूक करणार्‍या वाहनांची धुळीपासून संरक्षण होणार आहे. बायपास लगत असणार्‍या शेतातील पिकेही धुळीने जर्जर होत होती. त्यामुळे या शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. केलवड भागातील बहुतांशी मार्गांचे डांबरीकरण झाले आहे. काकडी विमानतळामुळे हे रस्ते पक्के झाले. याचे श्रेय आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना जाते. यामुळे जिरायती टापूतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या बायपासचे काम मार्गी लावल्याबद्दल केलवड येथील बाजार समितीचे संचालक सुनिलराव गमे, पंचायत समितीचे सदस्य काळू रजपूत, माजी उपसरपंच भारत राऊत, उपसरपंच विशाल वाघे, अंजाबापू जटाड आदींनी आ. विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com