समशेरपूर आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे 14 संचालक अपात्र

कर्ज थकबाकीमुळे सहकार खात्याची मोठी कारवाई
समशेरपूर आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे 14 संचालक अपात्र

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक व्यवहार असणार्‍या समशेरपूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 15 पैकी 14 संचालकांचे संचालक पद रद्द करण्यात आले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क अ(1)(अ) संस्थेच्या मंजूर उपविधी 9(14) अन्वये सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी ही कारवाई केली. या संचालकांकडे संस्थेची थकबाकी असल्याने सहकार खात्याने कडक कारवाईचे पाऊल उचलले.

संस्थेचे चेअरमन सोमनाथ म्हातारबा मेंगाळ, व्हा. चेअरमन दत्तू कारभारी ढोन्नर, संचालक अशोक रामभाऊ गावंडे, संतोष रामनाथ बेणके, दत्तात्रय रामनाथ भरीतकर, चक्रधर भिमाजी सदगीर, दत्तू भागा घोडसरे, रमेश केरु बेनके, पाटीलबा आजाबा मधे, किसन धोंडीबा आगिवले, नामदेव सखाराम बांगारे, लहानु भागा मेंगाळ, मंनाबाई सिताराम गावंडे, मंदाबाई नाथु बांगारे हे सर्व संचालक थकबाकीदार झाल्याने सर्वांचे संचालक पद रद्द झाले. लक्ष्मण कोंडाजी मेंगाळ हे एकमेव संचालक म्हणून कार्यरत राहिले. सन 2017 ते सन 2021 या कालावधीतील ही थकबाकी आहे.

थकबाकीमुळे इतक्या मोठ्या संख्येने संस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन सहित 14 संचालकांचे पद रद्द होण्याची अकोले तालुक्यातील ही पहिलीच कारवाई झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. तालुक्यातील अन्यही सहकारी संस्थेत थकबाकीदार असलेल्या संचालकांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. सभासदांनी विश्वासाने निवडून दिलेले संचालकच जर थकबाकीदार होणार असतील तर संस्था चालणार कशा? हा प्रश्न आहे. संस्थेचे संचालक संतोष बेनके यांनी केलेल्या तक्रार अर्जाची सहकार खात्याने गंभीर दखल घेऊन याबाबत सखोल चौकशी करून हा निर्णय घेतला.

या सर्वांकडे अल्पमुदत आणि दीर्घ मुदतीचे येणे कर्ज होते. संचालक म्हणून अपात्रता धारण केल्याने त्यांचे समिती सदस्यत्व बंद करून जागा रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. सहकार अधिनियमाच्या कलम 73 क अ च्या पोटकलम 3 अन्वये समितीचा पुढील पाच वर्षांचा कालावधी समाप्त होईपर्यंत अपात्र सदस्य पुन्हा नियुक्तीस पात्र असणार नाहीत किंवा पुन्हा स्विकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास अपात्र असल्याचेही सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी घोषित केले. सहकार खात्याने केलेल्या या कारवाईचे ज्येष्ठ नेते कोंडाजी ढोन्नर, बबनराव सदगीर, दत्तू सदगीर, लक्ष्मण घोडसरे, शंकर सदगीर, कुंडलिक सदगीर, रामनाथ गारले, सुभाष फोडसे आणि अन्य सभासदांनीही स्वागत केले आहे.

संस्थेवर प्रशासक येणार ?

एकूण 15 संचालकांपैकी 14 संचालक अपात्र ठरल्याने सभेसाठी आवश्यक गणपूर्ती (कोरम) राहिली नाही. पर्यायाने पुढील निवडणूक होऊन नव्याने संचालक मंडळ आस्तित्वात येईपर्यंत सहकार खात्याकडून संस्थेवर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता आहे. यापुढील संस्थेच्या कारभारावर सहकार खात्याकडून नियुक्त प्रशासकावर समशेरपूरच्या आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या कारभाराची धुरा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com