समशेरपूर टोमॅटो उत्पादकांचे आंदोलन

समशेरपूर टोमॅटो उत्पादकांचे आंदोलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी, एकरी किमान 50 हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथील समशेरपूर बाजार समितीमध्ये तीव्र आंदोलन केले.

टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा यासाठी, नेपाळ पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोची निर्यात करण्यात येणार्‍या अडचणी तातडीने सोडवाव्यात, महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात टोमॅटोची कोठे मागणी आहे याचा तातडीने शोध घेऊन या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत, कोविड लॉकडाऊनचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन हे उद्योग तातडीने सुरु करण्याबाबत सरकारने पावले टाकावीत, टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना भावी काळात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून बाजार समित्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी, टोमॅटो उत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकावीत, टोमॅटो पिकासाठी वापरली जाणारी कीटकनाशके, विषाणू विरोधी औषधे, पोषके व खते यांची किंमत वाढवून कंपन्यांकडून टोमॅटो उत्पादकांचे अतोनात शोषण केले जाते. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून टोमॅटो उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात शेतकर्‍यांना मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा या मागण्या यावेळी टोमॅटो उत्पादकांनी केल्या. किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामध्ये यावेळी परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.

राज्यात सध्या टोमॅटो उत्पादकांवर प्रचंड संकट आले असताना राज्यातील सत्ताधारी व विरोधक मात्र भलत्याच विषयांवर एकमेकांवर चिखलफेक करत आहेत ही अत्यंत संतापजनक बाब आहे. राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी या संकटाच्या काळात तरी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी व टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याबद्दल गांभीर्याने पावले टाकावीत. असे जर झाले नाही तर मात्र सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी डॉ. अजित नवले, संदीप दराडे, महेश नवले, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, पांडुरंग कातोरे, अविनाश धुमाळ, शंकर चोखंडे, तुकाराम मेंगाळ, दगु एखंडे, निवृत्ती नाना बेणके, सुनिल दराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com