समृद्धी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला द्या - आमदार काळे

समृद्धी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला द्या - आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

समृद्धी महामार्गावर जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरात नगर-मनमाड राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी होणार्‍या प्रस्तावित सर्कलसाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनीचा प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाला दिल्या आहेत.

आ. काळे यांच्याकडे समृद्धी महामार्गावरील जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरात होणार्‍या प्रस्तावित सर्कलसाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी अडचणी मांडल्या होत्या. त्याबाबत प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार कोतवाल यांच्या समवेत बैठक घेतली.

जेऊर कुंभारी व कोकमठाण हा परिसर पूर्णपणे बागायती असताना देखील सात बारा उतार्‍यावर मात्र जिरायती लावण्यात आले आहे. प्रस्तावित सर्कलसाठी ज्यावेळी मोजणी करण्यात आली. त्यावेळी सदर शेतामध्ये उसाचे पीक होते व आज रोजी त्या शेतात सोयाबीनचे पीक असल्यामुळे जिरायती नोंद न घेता बागायती नोंद घेऊन बागायती जमिनीचा दर मिळावा.

प्रस्तावित सर्कलसाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत व त्या शेतकर्‍यांकडे जे एक ते पाच गुंठे जमीन शिल्लक राहत असेल तर ती शेतजमीन देखील खरेदी करावी.

जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत सर्कलचे काम सुरू होत नाही तोपर्यंत संपादित शेत जमिनीमध्ये पीक घेण्यास परवानगी द्यावी आदी अडचणी व मागण्या प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या होत्या. त्याबाबत प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार कोतवाल यांना शेतकर्‍यांच्या असलेल्या मागण्या व येत असलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर करून शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचे योग्य मूल्य तातडीने मिळावे यासाठी प्रयत्न करावे.

समृद्धी सर्कल जेऊर कुंभारी व कोकमठाण या परिसरात नगर मनमाड राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंनी होणार आहे. त्यासाठी कोणत्या शेतकर्‍यांचे किती क्षेत्र जाणार व कुठले जाणार याची माहिती द्यावी व सर्वच शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून द्यावा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या.

बैठकीसाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार कोतवाल, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, जिनिंग प्रेसिंगचे संचालक सचिन आव्हाड, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, सुनील बोरा, वसंतराव आव्हाड, रामनाथ आव्हाड, विजय रोहोम, डॉ. यशराज महानुभाव, डॉ. ओंकार जोशी आदींसह प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com