समृद्धी महामार्गाचे काम जोमात; शेतकरी मात्र कोमात

समृद्धी महामार्गाचे काम जोमात; शेतकरी मात्र कोमात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाच्या चांदेकसारे येथील कामाचा ठेका घेतलेल्या गायत्री कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्‍यांचे संसार पाण्यात गेले असून त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीस गायत्री कंपनी जबाबदार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

चांदेकसारे येथील कामाचा ठेका गायत्री कंपनी मिळाला. त्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांकडून शेतजमीन विकत घेऊन त्यात उत्खनन सुरू केले आहे व काही ठिकाणी खडी क्रेशर सुरू केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.

चांदेकसारे हद्दीत सर्वे नंबर 146 मध्ये तब्बल 6 एकरात दगड उत्खनन सुरू आहे. तसेच खडी क्रेशरमुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होत आहे. त्यामुळे शेजारच्या शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे तसेच होणार्‍या उत्खननामुळे सर्वे नंबर 146 मधील शेतकर्‍याच्या पक्के बांधकाम असलेल्या घराला तडे गेल्याने पावसाचे पाणी घरात येत आहे. तसेच या भागात पाटबंधारे विभागातून आवर्तन येत होते परंतु या उत्खननामुळे चारीस तडे गेले आहे त्यामुळे शेतकरी आवर्तनापासून वंचित राहिल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याबरोबर शेजारील शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे, अशी माहिती शेतकरी अशोक होन यांनी दिली.

या पार्श्वभुमीवर शेतकर्‍यांनी गायत्री कंपनीच्या अधिकार्‍यांच्या कानावर ही गोष्ट घातली असून वेळोवेळी अधिकार्‍यांना समक्ष जाऊन निवेदन देखील दिले आहे. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर बाधित शेतकर्‍यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सर्व बाधित शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मौजे चांदेकसारे येथील बाधित शेतकर्‍यांमध्ये पोपट भानुदास होन, दीपक सिताराम होन, शांतिलाल सिताराम होन, किशोर पोपट होन, अशोक पोपट होन यांचे नुकसान होत आहे. अशोक होन यांनी सांगितले की, आमच्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही गेट बंद करून कायदेशीर कारवाई करणार आहोत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com