
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
महाराष्ट्र शासनाचा समृद्धी महामार्ग गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. ठरलेल्या मुदतीत या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र ते आज रोजी पूर्ण होऊ शकले नाही. चांदेकसारे परिसरात या समृद्धी महामार्गाचे कामामुळे अनेक गावांना जोडणारे रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांची पुरती वाट लागली असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
कोपरगाव तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात असून या महामार्गाचे काम सुरू असताना अनेक अडथळे निर्माण झाले. गायत्री कंपनीकडे या कामाचा ठेका होता. मात्र स्थानिक नागरिक व शेतकरी यांना विश्वासात घेण्यात कंपनीचे अधिकारी कमी पडले. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, भोजडे, संवत्सर, कोकमठाण, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द, चांदेकसारे, देर्डे कोर्हाळे, मढी खुर्द आदी गावातून हा महामार्ग जात आहे.
या महामार्गाचे काम करत असताना मोठमोठे डंपर गावच्या आजूबाजूचे स्थानिक रस्ते वापरतात. वास्तविक पाहता या रस्त्याची दर पंधरा दिवसांनंतर कंपनीने दुरुस्ती करून द्यायला पाहिजे मात्र तसे होत नाही. गायत्री कंपनीतून देखील चांदेकसारे परिसराचे काम आता राज कंपनीकडे आले आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपूल, गावाला जोडणारे पुलाचे काम झाले आहे मात्र या पुलाखालून पाणी निघण्यासाठी जागा नसल्याने स्थानिक नागरिकांना आपली वाहने चालवण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.
काही भागात शाळेच्या मुलांना जाण्यासाठी एसटी बस सेवा सुरू आहे मात्र या खराब झालेल्या रस्त्यामुळे बस देखील गावापर्यंत पोहोचत नाही परिणामी शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. समृद्धी महामार्गाचे काम करणार्या कंपनीने ताबडतोब परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी व उद्भवलेला प्रश्न सोडवावा, अशी मागणी सध्या चांदेकसारे परिसरातून होत आहे.