समृद्धी महामार्गात विना वेष्टन टाकल्या भूमिगत वीजवाहिन्या

आमदार आशुतोष काळेंकडून ठेकेदार व अधिकार्‍यांची खरडपट्टी
समृद्धी महामार्गात विना वेष्टन टाकल्या भूमिगत वीजवाहिन्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

समृद्धी महामार्गामध्ये महामार्ग ओलांडून जाणार्‍या वीजवाहिन्या भूमिगत टाकताना या वीजवाहिन्यांना टणक पाईपाचे वेष्टन असणे

व वीजवाहिन्या आराखड्यानुसार जमिनीखाली योग्य अंतरावर असणे बंधनकारक आहे. जेणेकरून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात यदाकदाचित या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर त्या वीज वाहिन्या दुरुस्त करता येणे शक्य होईल.

मात्र संबंधित ठेकेदाराने कोणत्या प्रकारचे वेष्ठण पाईप वापरले याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार आशुतोष काळे यांना सदर वीजवाहिन्या विना वेष्टनच टाकल्याचे निदर्शनास येताच संबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे अधिकारी, महावितरण व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकार्‍यांची आमदार आशुतोष काळे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

समृद्धी महामार्गाबाबत झालेल्या विविध बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे व दिलेल्या सूचनांप्रमाणे आजतागायत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महावितरणच्या अधिकार्‍यांसमवेत कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यासाठी असणार्‍या नियंत्रण कार्यालयात बैठक घेतली.

आमदार काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बुजलेल्या चार्‍या, विविध ठिकाणी प्रस्तावित व आवश्यक असलेल्या ठिकाणी करावयाचे असलेले युटीलिटी डक्ट, तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेली कंपनी वापरत असलेले ग्रामीण मार्ग तसेच इतर जिल्हा मार्ग यांची दुरुस्ती, समृद्धी महामार्गामुळे वीज वाहिन्यांचे निर्माण झालेले प्रश्न, समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या सहठेकेदारांनी मशिनरी मालकांचे व कामगारांचे थकविलेले पेमेंट,

ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीतून समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज घेतले आहे त्या गौण खनिजाची उत्खनन व वाहतूक करताना खराब झालेले रस्ते व निर्माण झालेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी, तसेच समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या स्थानिक कामगारांच्या अडचणी याबाबत चर्चा करून आ.काळे यांनी आढावा घेतला.

या बैठकीदरम्यान अनेक शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्ग ओलांडून जात असलेल्या वीज वाहिन्यांना ठेकेदार निकृष्ट दर्जाचे वेष्टन पाईप वापरत असून नागरिकांना समजू नये यासाठी रात्रीच्या वेळीच हे काम उरकून घेत असल्याच्या तक्रारी आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या. तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आ. काळे यांनी या वीजवाहिन्या ज्या ठिकाणी रस्ता ओलांडून जात आहेत त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जेसीबीच्या सहाय्याने उकरून समृद्धी महामार्ग ओलांडून गेलेल्या वीज वाहिन्यांची पाहणी केली.

त्यावेळी या वीजवाहिन्यांना निकृष्ट दर्जाचे वेष्टन तर सोडाच परंतु या वीज वाहिन्या आराखड्याच्या पातळीनुसार खूपच वर असल्याचे व या वीज वाहिन्यांना कोणत्याही प्रकारचे वेष्टन वापरले नसल्याचे आढळून येताच संतापलेल्या आमदार आशुतोष काळेंनी संबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी करून चांगलीच खरडपट्टी काढली व संबंधित ठेकेदाराकडून हे काम काढून घेऊन नियोजित आराखड्यानुसार उच्च दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांना काम देण्याच्या सूचना केल्या.

तसेच यापूर्वी कोपरगाव तालुक्यात ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून गेल्या आहेत त्या सर्वच ठिकाणी उकरून महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्ग,महावितरणचे अधिकारी व स्थानिक शेतकर्‍यांना सोबत घेऊन पाहणी करावी. यापुढे ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जाणार आहेत त्या ठिकाणी सर्व अधिकारी व स्थानिक शेतकर्‍यांना समोर दिवसा काम करावे असे आदेश आ.आशुतोष काळे यांनी दिले.

या कामात गलथानपणा करणार्‍या सर्वच दोषींवर तातडीने कारवाई करावी. तसेच अशा प्रकारचे काम कोपरगाव तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक ताताराव डुंगा व त्यांच्या सहकार्‍यांना दिली.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धोंडीराम वक्ते, चारुदत्त सीनगर, दिलीप शिंदे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धोंडीराम वक्ते, सचिन आव्हाड, रोहिदास होन, सोपानराव आभाळे, विठ्ठलराव जावळे, केशवराव जावळे, सुधाकर होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, ज्ञानेश्वर गव्हाणे, योगीराज देशमुख, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, विलास चव्हाण, कृष्णा शिलेदार, संतोष पवार, नरहरी रोहमारे, रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे सूर्यवंशी, निरगुडे, बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com