
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
महाराष्ट्राला समृध्द करणारा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकण पट्ट्याला जोडला जाणार असल्याने या चार विभागातील कृषि आणि औद्योगिक क्षेत्र समृध्द होईल, असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे जोडलेल्या समृद्धी महामार्गाची पाहणी करुन कार्यक्रमाचा आढावा अधिकार्यांसमवेत घेतला. याप्रसंगी महाराष्ट्र रस्ते विकास अधिकार्यांसह स्थानिक प्रशासनातील आधिकारी उपस्थित होते. उद्घाटनाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी शिर्डी येथील समृध्दी महामार्गावर मोठा मंडप उभारण्यात आला असून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहता यावा असे नियोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी ना. विखे पाटील म्हणाले, समृध्दी महामार्ग जनतेच्या मनाशी जोडणारा महामार्ग आहे. राज्याच्या राजधानी पासून उपराजधानी पर्यंत जोडणारा राज्यातील हा पहिला मार्ग ठरला आहे. चार विभागांना जोडणारा महामार्ग 20 जिल्ह्यांमधून जात असल्याने त्या भागातील विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा महामार्ग विकसीत होण्यासाठी शेतकर्यांचे योगदान मोठे आहे. परंतु हा मार्ग आता शेती व्यवसायासाठी उपयुक्त ठरणार असून विदर्भ आणि खांदेश मधील शेतकरी आपला उत्पादीत माल थेट मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेवू शकणार आहे. त्यामुळेच या मार्गावर 17 ठिकाणी कृषि समृध्दी केंद्र उभारणार असल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी दिली.
राज्यातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटना बरोबरच हा मार्ग ग्रिनफिल्ड मार्ग म्हणून ओळखला जाईल. तसेच इंडस्ट्रीअल कॉरिडॉर म्हणूनही हा मार्ग आता सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. राज्यात उद्योगधंदे वाढीसाठी या मार्गाचा सर्वांनाच लाभ होणार आहे. या मार्गालगत औद्योगिक भुखंड राखीव ठेवण्यात आल्याने भविष्यात या मार्गाचा औद्योगिक विकासासाठी तसेच रोजगाराच्या संधीसाठी मोठा लाभ होईल, असे ना. विखे पाटील म्हणाले.