अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शास्तीमाफीच्या घोषणेनंतर जमा झालेल्या 28 कोटी रुपयांच्या निधीतून प्रभागात विकास कामे हाती घ्यावीत.

जनतेचा कररुपी पैसा जनतेसाठीच लोकोपयोगी कामासाठी वापरावा अशी मागणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

करोना संकट काळात महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. वर्षभरापासून प्रभागात एकही विकास काम होऊ शकले नाही. शास्तीमाफीमुळे महापालिकेच्या तिजोरीत 28 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यातून महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला. शास्तीमाफीतून जमा झालेला पैसा हा जनतेचा आहे.

त्यामुळे त्यातून जनतेसाठीच लोकोपयोगी कामे होणे गरजेचे आहे. प्रभागातील विकास कामांसाठी हा निधी राखीव ठेवावा, अशी मागणी बारस्कर यांनी केली आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या मागणीचा विचार करावा, तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा बारस्कर यांनी दिला आहे.