अन्यथा सकल मराठाकडून कर्जत बंद

संभाजी महाराजांचे उपोषण सोडवण्याची मागणी
अन्यथा सकल मराठाकडून कर्जत बंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत पोलिसांना निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे. अन्यथा 1 मार्चपासून निषेध नोंदविण्यासाठी कर्जत बंद ठेवून साखळी उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रक्रिया सुरू करावी. ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे त्याच पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोडमॅप तयार करून सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे व येणार्‍या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे 25 लाख रुपये कर्ज देण्यात यावे. महामंडळाला जाहीर केलेल्या 400 कोटी रुपयांच्या भागभांडवल लवकर द्यावे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी तात्काळ देण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर सकल मराठा समाज कर्जत तालुक्याचे समन्वयक धनंजय लाढाणे, नितीन तोरडमल, श्रीहरी जगताप, राहुल धोदाड, विजय मोरे, अमोल घालमे, अनिल कचरे, ड. धनराज राणे, प्रमोद पाडुळे, वैभव धोदाड, बबनराव लाढाणे, काकासाहेब काकडे आणि अशोक खेडकर यांच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com