अस्तगावला लाळ्या खुरकत, घटसर्पने सात गायी दगावल्या

अस्तगावला लाळ्या खुरकत, घटसर्पने सात गायी दगावल्या
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

लाळ्या खुरकत, घटसर्पने केलवड येथील अनेक गायी दगावल्यानंतर अस्तगाव येथे याच आजाराने पंधरा दिवसांत 6 गायींसह एक कालवड दगावली आहे. त्यामुळे परिसरातील गोपालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अस्तगाव येथे 7 सप्टेंबरला पहिल्यांदा बाळासाहेब तुकाराम सालपुरे यांची पिंपळवाडी येथून आणलेली गाय या आजाराने दगावली. त्यानंतर नगर-मनमाड हायवेच्या पश्चिमेला नळे वस्तीवरील किसन भागवत नळे यांची एक गाय 13 सप्टेंबरला दगावली. 20 सप्टेंबरला तुकाराम विश्राम आरंगळे यांची राहुरी येथून आणलेली एक गाय व तीची कालवड दगावली. सुनील लहानु सापते यांची एक कालवड काल दगावली तर चोळकेवाडीचे पोलीस पाटील प्रदीप धोंडिराम चोळके यांची एक गाय व एक कालवड काल दगावली. असे सहा गायी व एक कालवड लाळ्या खुरकत व घटसर्प या आजाराने दगावली आहे.

दरम्यान अस्तगाव भागातील 3129 व चोळकेवाडी येथील 1285 जनावरांना लाळ्या खुरकत, घटसर्प रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तरीही काही गायी लसीकरण होऊनही दगावल्या आहेत. त्यामुळे गोपालकांमध्ये चिंतेचे वातारण आहे. काल येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पंडूरे यांनी मृत गायीचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. चोळकेवाडीचे पोलीस पाटील प्रदीप चोळके यांच्या गोठ्यातील इतर चार गायी बाधित आहेत. या प्रकाराची दखल घेत पशुवैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सरकारी पशुवैद्यकांना खासगी पशुवैद्यक सहकार्य करत आहेत.

दरम्यान अस्तगाव व चोळकेवाडी भागातील लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे डॉ. उमेश पंडूरे यांनी सांगितले. तरकसवाडीचे लसीकरण चालू असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.