रेमडेसिवीरची १८ हजाराला विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

कोतवाली पोलिसांची नालेगावात कामगिरी
रेमडेसिवीरची १८ हजाराला विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

अहमदनगर | Ahmedagar

केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

चार हजार रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल १८ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यात एका महिला नर्सचा समावेश आहे. ईशा राजू जाधव, शुभम विजय नांदुरकर (रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शुभम नांदुरकर याला पोलिसांनी आज पहाटे चार वाजता अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांच्या पथकाने नालेगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी चढ्या भावाने रेमडेसिवीरची विक्री करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. एक डमी ग्राहक तयार करून नालेगाव परिसरातील गाडगीळ पटांगणात सापळा लावला. आरोपी त्याठिकाणी एक रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन येताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. आरोपी हे मृत कोव्हिड रुग्णांच्या नावावर रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून ते चढ्या भावाने विक्री करत होते.

हे इंजेक्शन केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरच्या संलग्न असलेल्या मेडिकल मधून खरेदी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या मागची साखळी शोधून काढण्याचे काम पोलीस करत आहे. दरम्यान, याबाबत औषध प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी अधिकारी उपलब्ध न झाल्याने डमी ग्राहकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com