सलाबतपूरच्या सराफाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यास पोलिसांना विरोध

पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
सलाबतपूरच्या सराफाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यास पोलिसांना विरोध

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

पनवेल येथील एका चोरी प्रकरणातील आरोपीने नेवासा तालुक्यातील सराफाकडे दागिने दिल्याची कबुली दिल्याने आरोपीला घेऊन नेवासा पोलिसांसह सलाबतपूर येथील सराफ दुकानात चौकशीसाठी गेलेल्या पनवेल पोलिसांना दुकान मालकाने सहकार्य न करता त्याने व त्याच्या नातेवाईकांनी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली तसेच सराफास ताब्यात घेताना त्याच्या नातेवाईकांनी हुज्जत घालून झटापट केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पनवेल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळंदे हे आरोपी विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण याने घरफोडीच्या गुन्ह्यात दिलेल्या कबुलीमुळे त्याला घेऊन नेवासा पोलीस ठाण्यात रिपोर्ट देवून नेवासा पोलिसांची मदत घेवून तालुक्यातील सलाबतपूर येथे सराफ दुकानात चौकशीसाठी गेले होते.

सराफ दुकान मालक सुजित सुभाष कपिले याने पोलिसांना सहकार्य न करता मी कुठेही येणार नाही, मला काहीही विचारु नका नाहीतर मी औषध पिऊन आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्याचे वडील सुभाष कपिले, सुजितची पत्नी सुवर्णा सुजित कपिले, सुजितची भावजई अपर्णा दीपक कपिले सर्व रा. सलाबतपूर ता. नेवासा तसेच सुजितची मावशी रंजना पुरुषोत्तम डहाळे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर या सर्वांनी आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा आणला. तसेच त्याचे वडील, पत्नी, भावजई व मावशी यांनी आम्ही सर्व औषध पिऊन आत्महत्या करतो असे बोलून तसेच सुजितला ताब्यात घेत असताना त्याच्या वडिलांनी त्याची ओढाताण करुन पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा आणला.

पनवेल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश काशिनाथ पाळंदे यांच्या वरील फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात वरील पाच जणांविरुद्धभारतीय दंडविधान कलम 353 309 143 147 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com