
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
दरोडा, घरफोडी, रस्तालूट, घातक शस्त्रांसह जबरी चोरी आदी गुन्हे संघटीतपणे करुन दहा वर्षापासून नेवासा-श्रीरामपूर तालुक्यासह विविध ठिकाणी दहशत निर्माण करणार्या नेवासा तालुक्यातील सलाबतपूरच्या रामसिंग भोसले याच्या 11 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या 11 पैकी 6 जण अटकेत आहेत तर 5 जण पसार आहेत.
याबाबत माहिती अशी की, 24 सप्टेंबर 2021 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गुन्हा रजिस्टर नं. 669/2021 भारतीय दंड विधान कलम 395, 394, 458, 120 (ब), 34 हा गुन्हा नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील रामसिंग त्रिंबक भोसले याच्या टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्यावतीने प्रभारी अधिकार्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक यांचेकडे या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमान्वये वाढीव कलम लावण्यास मंजुरी दिली.
सदर टोळीत एकूण 11 सदस्य असून ते सर्व नेवासा तालुक्यातील आहेत. त्यातील 7 जण सलाबतपूर येथील, दोघे गोंडेगाव येथील एकजण गेवराईचा तर एकजण नेवासाफाटा येथील आहे.
या टोळीने नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, नेवासा, सोनई, शिर्डी, शनीशिंगणापूर तसेच शिल्लेगाव (औरंगाबाद ग्रामीण) या पोलीस ठाण्याअंतर्गत 2012 पासून मागील 10 वर्षात 20 गंभीर गुन्हे केले. कट करुन दरोडा टाकणे, घरफोडी, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांसह जबरी चोरी, अग्नीशस्त्रासह दरोडा, रस्ता अडवून मारहाण करुन दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करणे, मारहाण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन व स्वतःच्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करुन केले.
या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन 1999 चे कलम 3(1)(सेकंड), 3(2), व 3(4) अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या परवानगी ‘मोक्का’ अन्वये कारवाई करण्यात आली असून अशाप्रकारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणार्या अन्य टोळ्याविरुद्धही आगामी काळात नगर जिल्ह्यात ‘मोक्का’ अन्वये कारवाि करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.
नेवासा पोलीस ठाण्यात सर्वाधिक 11 गुन्हे
रामसिंग भोसले याच्या टोळीतील आरोपींवर नेवासा पोलीस ठाण्यात सर्वाधिक 11 गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूर शहर (3), श्रीरामपूर तालुका (1), सोनई (1), शिंगणापूर (1), शिर्डी (1) त्याचबरोबर औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. यातील सर्वाधिक 4 गुन्हे 2021 मधील आहेत. त्यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत 2, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अंतर्गत 1 व शिर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत एका गुन्ह्याचा समावेश आहे. 2020 मध्ये या टोळीविरुद्ध 3 गुन्हे दाखल झालेण 2019, 2018, 2017, 2016, 2013 व 2012 या सहा वर्षात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल झाले. 2015 मध्ये एक गुन्हा दाखल झाला.
सलाबतपूरचे 7, गोंडेगावचे 2 तर नेवासाफाटा व गेवराईचा प्रत्येकी एक आरोपी
गुन्ह्यातील आरोपींमध्ये अजय अशोक मांडवे (वय 22), प्रद्युम्न सुरेश भोसले (वय 19), रामसिंग त्रिंबक भोसले (वय 30), सचिन सुरेश भोसले (फरार, वय उपलब्ध नाही), डिच्चन त्रिंबक भोसले व रकुल दशरथ चव्हाण (फरार), आसिफ नसिर शेख (सर्व 7 जण रा. सलाबतपूर ता. नेवासा), समीर ऊर्फ चिंग्या राजू सय्यद (वय 21) रा. नेवासाफाटा, बाळासाहेब ऊर्फ बयग सुदमल काळे (वय 34) रा. गेवराई ता. नेवासा, बाबाखान शिवाजी भोसले व सुनील बाबाखान भोसले (दोघेही फरार, रा. गोंडेगाव ता. नेवासा) या 11 जणांचा समावेश आहे.