सलाबतपूर परिसरात वीज तोडणी मोहीम सुरू

शेतकरी संतप्त
सलाबतपूर परिसरात वीज तोडणी मोहीम सुरू

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात वीजवितरणच्या अधिकार्‍यांनी थकित वीजबिलाच्या कारणाने शेतकर्‍यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

परिसरातील शेतकर्‍यांना सतत संकटाचा सामना करावा लागत आहे. खरिपाच्या पिकाला अस्मानी संकटामुळे तद्नंतर रब्बीच्या पिकावेळी सुरुवातीला वीजवितरणच्या अधिकार्‍यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता कनेक्शन कट केले होते. त्यामुळे रब्बी पिकाचे उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यावेळी शेतकर्‍यांनी थोडेफार पैसे भरल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, आता पिकाची उत्पादन क्षमता वाढीसाठी पाण्याची पिकांना नितांत गरज असताना वीजवितरणने मार्चअखेर वसुलीच्या नावाखाली पुन्हा कनेक्शन तोडण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने व दिवसभर उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. कांद्यांचे पीक घेता यावे म्हणून स्थानिक कारखान्यांना उसाची नोंद असताना अनेक शेतकर्‍यांनी बाहेरील कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन ऊसतोड करून कांद्याच्या लागवडी केल्या. मात्र, ऐन पिके जोमात असताना केवळ विजेअभावी पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वीज वितरणने त्वरीत वीज कनेक्शन जोडणी करावी, अशी मागणी विठ्ठलराव लंघे व परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com